हिंदूंनी अत्याचार न विसरता अन्यायाच्या विरोधात लढायला शिकावे ! – कपिल मिश्रा, माजी आमदार आणि संस्थापक अध्यक्ष, हिंदु इकोसिस्टीम
सिवनी आणि मंडला (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेच्या १० व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने आयोजित हिंदु धर्मजागृती सभा !
जबलपूर (मध्यप्रदेश) – काश्मिरी हिंदूंकडे भरपूर ऐहिक गोष्टी होत्या; परंतु सतर्कतेचा अभाव आणि लढण्याच्या क्षमतेचा अभाव यांमुळे त्यांना नाईलाजाने काश्मीरमधून स्थलांतरित व्हावे लागले. पाकिस्तान आणि ढाका (बांगलादेश) येथून हिंदूंना पळून यावे लागले. फाळणीच्या वेदना हिंदु समाज सहजतेने विसरला. असे आपण सर्व विसरत राहिलो, तर येणाऱ्या काळात बंगाल, केरळसह अन्य हिंदु अल्पसंख्यांक झालेल्या ८ राज्यांतून हिंदूंना पलायन करावे लागेल. हे टाळण्यासाठी हिंदूंना अन्यायाच्या विरोधात कसे लढायचे, हे शिकावे लागेल, असे प्रतिपादन ‘हिंदु इकोसिस्टिम’चे संस्थापक आणि माजी आमदार श्री. कपिल मिश्रा यांनी केले. हिंदु सेवा परिषदेच्या १० व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने मंडला येथे गदा यात्रा आणि विशाल धर्मसभा यांचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या सभेला हिंदु सेवा परिषदेचे कोषाध्यक्ष श्री. बंटी लालवानी, हिंदु सेवा परिषदेचे मंडला प्रदेश महासचिव श्री. धर्मेंद्रसिंह ठाकूर यांनीही संबोधित केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक श्री. श्रीराम काणे यांनी ‘हलाल अर्थव्यवस्था’ या विषयावर भाषण केले.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्माचरणास प्रारंभ करा ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु राष्ट्रासाठी आज प्रत्येक हिंदूने सक्षम बनले पाहिजे. याचा प्रारंभ धर्माचरणातून होईल. कपाळाला टिळा लावणे, हिंदु संस्कृतीनुसार तिथीच्या दिवशी वाढदिवस साजरा करणे, सण-उत्सवांना मंगल वस्त्र धारण करणे यांसारख्या कृतीतून धर्माचरण करण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक हिंदु मनामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करूया.
हलाल अर्थव्यवस्था हा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा आघात ! – श्रीराम काणे, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती
हलाल प्रमाणपत्र केवळ मांस विक्रीपर्यंत मर्यादित नसून खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे अशा दैनंदिन आवश्यकतेच्या वस्तूंचे उत्पादक ही हलाल प्रमाणपत्र घेत आहेत. हे प्रमाणपत्र इस्लामिक संस्थांद्वारे सशुल्क दिले जात आहे. या इस्लामी संघटना अनेक आतंकवादी घटनांतील आरोपींना कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून देत आहेत. थोडक्यात आपलाच पैसा केवळ प्रमाणपत्राच्या नावावर गोळा करून तो आतंकवाद्यांच्या रक्षणासाठी वापरला जात आहे. आज हलाल अर्थव्यवस्थेने विक्राळ स्वरूप धारण केले असून, ती जागतिक स्तरावर ७ ट्रिलीयन डॉलरपर्यंत पोचली आहे, जी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरील हा मोठा आघात रोखण्यासाठी व्यापक जागृतीची आवश्यकता आहे.
हिंदूंनी धर्मांतराच्या विरोधात सतर्क राहून कृतीशील व्हायला पाहिजे ! – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना
सिवनी (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील आदिवासी क्षेत्रांत आजही मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. एक हिंदु धर्मांतरित झाला, तर आपण धर्मांतरित झालेल्या १० हिंदूंचे शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात घेतले पाहिजे. आज हिंदूंना प्रलोभने दाखवून, फसवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. हिंदूंनी सतर्क राहून कृतीशील व्हायला पाहिजे. हिंदूंनी आपल्या धर्मबांधवांच्या रक्षणासाठी घराबाहेर पडले पाहिजे. देशातील सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हा एकमात्र उपाय आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. हिंदु सेवा परिषदेच्या १० व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री श्री बालसंत नवनीतजी महाराज, हिंदु सेवा परिषदेचे प्रदेश सहसचिव श्री. धनराज मानासिंह ठाकूर, किशोरी श्वेता तिवारी आणि हिंदु सेवा परिषदेचे सिवनी प्रभारी (अतिरिक्त पदभार सांभाळणारे) श्री. उत्कर्ष रावत उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.