संभाजीनगर येथे खोट्या खरेदीखताद्वारे भूमीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी तलाठी आणि मंडळ निरीक्षकासह ५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !
प्रशासनातील अधिकारीच अयोग्य कृती करत असतील, तर भ्रष्टाचार कसा थांबणार ? संबंधितांच्या विरोधात केवळ गुन्हा नोंदवून न थांबता त्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे ! – संपादक
संभाजीनगर – निवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या मेहुण्याची शरणापूर येथील २ एकर भूमी तलाठी आणि मंडळ निरीक्षक यांसह ५ जणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत बनवून परस्पर विकली. या प्रकरणी आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बाबासाहेब सरवदे यांनी याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
सरवदे यांनी त्यांचे मेहुणे आणि निवृत्त पोलीस उपअधीक्षक एम्.एम्. मुळे यांच्या मध्यस्थीने ९ जानेवारी २००६ या दिवशी शरणापूर शिवारातील गट क्रमांक ५७ मध्ये ८७ आर्. भूमी छावणी येथील अशपाक हमीद आणि मिनाज हमीद यांच्याकडून खरेदी केली होती. १ मार्च २०२२ या दिवशी सरवदे यांना दूरभाष आला आणि तुमची शरणापूरची भूमी विकली काय ? असे विचारले, तसेच सरवदे यांच्या भ्रमणभाषवर सातबारा पाठवला. यानंतर सरवदे यांनी भाऊ सदाशिव सरवदे आणि मुळे यांना सांगितले.
खोटी कागदपत्रे आणि तलाठी यांनी केलेल्या सातबाराच्या आधारे कल्याण कान्हेरे, विनोद इंगळे आणि काही ब्रोकर ही भूमी विजय साळे, किशोर म्हस्के आणि विष्णू जगताप यांना विकण्याच्या सिद्धतेत असल्याचे मुळे यांना कळले. यानंतर सरवदे यांनी भूमी खरेदी करणार्या लोकांना भेटून त्यांना सर्व खरी माहिती दिली, तसेच कान्हेरे यांच्याकडे असलेले खरेदीखत बनावट असल्याचे सांगितले. दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी ३० मार्च या दिवशी कल्याण रामचंद्र कान्हेरे, विनोद इंगळे, रवि साळवे, रमेश पांडे, तलाठी दिलीप जाधव, मंडळ निरीक्षक एल्.जी. गाडेकर आणि अनोळखी ब्रोकर, खोटी कागदपत्रे सिद्ध करणारे यांच्या विरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.