अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे पुजार्‍याची चाकूने वार करून हत्या !

अंबाजोगाई (जिल्हा बीड) – शहरापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेपवाडी येथील हनुमान मंदिरातून गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा करून घरी परतणारे पुजारी संतोष पाठक यांच्यावर एका तरुणाने चाकूने वार केले. त्यामध्ये पुजारी पाठक यांचा मृत्यू झाला. मंदिराजवळ आरोपी तरुण पांडुरंग शेप याचे घर असून पाठक यांच्यावर आक्रमण करण्यापूर्वी तो घराबाहेर बसून चाकूने बीट कापून खात होता. पुजारी पाठक यांना पहाताच त्यांना त्याने दारात बोलावले आणि अचानक त्याने त्यांच्यावर चाकूने वार केले. आरोपी शेप याला अटक करून त्याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे, तसेच त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

घटना घडत असतांना ३ महिलांनी आरोपीवर दगडफेक करत पूजार्‍याला वाचवण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर घायाळ झालेल्या पुजार्‍यांना ग्रामस्थांनी स्वाराती रुग्णालयात भरती केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अद्याप हत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले, ‘आरोपी पांडुरंग अच्युत शेप हा मनोरुग्ण असून त्याच्यावर औषधोपचार चालू आहेत. हत्या केल्यानंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात उपस्थित झाला आहे. आम्ही त्याच्याकडे अनेक गोष्टींची विचारपूस केली; मात्र तो काहीच बोलत नाही.’ ‘पुजारी संतोष पाठक हे मीतभाषी, अजातशत्रू आणि सर्वांशी हसतमुखाने बोलणारे होते’, असे समजते.