उरलेल्या अडीच वर्षांत तरी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते
सातारा, ४ एप्रिल (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून औरंगजेबाने मारले. आजही याच महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाने एक शहर आहे. ‘त्या औरंगाबादचे संभाजीनगर व्हावे’, असे कुठल्याही राज्यकर्त्याला वाटत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. मुख्यमंत्र्यांनी आता उरलेल्या अडीच वर्षांत तरी औरंगाबदचे नाव संभाजीनगर करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. १ एप्रिल या दिवशी कोडोली (जिल्हा सातारा) येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने धर्मवीर बलीदान मासानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक-अध्यक्ष नितीन चौगुले उपस्थित होते. कोडोली आणि पंचक्रोशीतील २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन जाधव यांनी केले. ओंकार डोंगरे यांनी उपस्थितांना हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ‘आजच्या युवकांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन जीवनाची वाटचाल करावी’, असेही शरद पोंक्षे यांनी सांगितले.
क्षणचित्र : कार्यक्रमस्थळी क्रांतीकारकांची माहिती देणारे फ्लेक्सचे प्रदर्शन लावण्यात आले होते.