कोल्हापूरमधील मुक्त सैनिक वसाहतीमधील माझ्या सभेत दगडफेक ! – चित्रा वाघ, भाजप
गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा !
कोल्हापूर, ४ एप्रिल (वार्ता.) – कोल्हापूर येथील मुक्त सैनिक वसाहत येथे ३ एप्रिल या दिवशी रात्री ७ वाजता झालेल्या माझ्या प्रचाराच्या सभेत दगडफेक झाली. ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. वर्ष २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात १६२ बलात्कार, ३१६ विनयभंग, ८४ ‘पोक्सो’, ४७ खून, १ सहस्र ४१४ चोरीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत, तर वर्ष २०२२ मध्ये केवळ २ मासात बलात्काराच्या २३ आणि विनयभंगाच्या ५५ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांच्याच जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था यांचे तीन-तेरा वाजले आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ४ एप्रिल या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
१. मी गेली अनेक वर्षे राजकारणात आहे; मात्र अशी घटना माझ्या संदर्भात पहिल्यांदाच घडत आहे. कुठल्याही निवडणुकीत अशा पद्धतीच्या घटना घडणे, हे निंदनीय आहे. मीच नाही तर माझ्यासारख्या वेगवेगळ्या पक्षाच्या सहस्रो महिला प्रचारांमध्ये काम करत असतात. त्यामुळे महिलांविषयी असा प्रकार होणे ही गंभीर गोष्ट आहे. या संदर्भात मी कोल्हापूर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून त्यांनीही दगडफेक झाल्याचे मान्य केले आहे. याविषयी पोलिसांनी अन्वेषण करून लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडावे.
२. कोल्हापुरात गृहराज्यमंत्री विरोधकांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या सभांच्या ठिकाणी काढलेल्या रांगोळ्या पुसल्या जात आहेत. काँग्रेसला मतदान न केल्यास चाकरीवरून काढून टाकल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. वास्तविक गृहराज्यमंत्र्यांनी ही दहशत बलात्कारी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर दाखवणे अपेक्षित आहे, विरोधकांवर नाही.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सभेमध्ये झालेली दगडफेक ही नियोजनबद्ध आणि ‘स्टेज मॅनेज घटना’ होती, असा आरोप गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे.