पुरी (ओडिशा) येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाक घरातील ४० चुलींची अज्ञातांकडून तोडफोड !
ओडिशामधील बिजू जनता दल सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून सत्य हिंदूंसमोर आणणे आवश्यक !
भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशाच्या पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाक घरातील मातीच्या ४० हून अधिक चुली अज्ञातांकडून तोडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या चुलींवर मंदिराचा महाप्रसाद बनवण्यात येत होता. हे जगातील सर्वांत मोठे स्वयंपाक घर आहे. याला येथे ‘रोस घर’ म्हटले जाते. येथे प्रतिदिन ३०० क्विंटल भात बनवला जातो. सध्या येथे २४० चुली आहेत. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेतला जात आहे. या तोडफोडीच्या घटनेत मंदिराचे सेवक सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे; कारण येथे पारंपरिक अनुष्ठान पूर्ण करण्यावरून येथे वाद झाला होता. ४ सेवकांची चौकशीही करण्यात येत आहे.
१. जिल्हाधिकारी समर्थ वर्मा यांनी सांगितले की, या घटनेमुळे भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात अडचण निर्माण होऊ शकते; मात्र २ दिवसांत ही स्थिती सुधारण्यात येईल.
२. ‘मंदिराच्या सुरक्षेसाठी २४ घंटे सुरक्षारक्षक तैनात असतांना अशी घटना कशी घडू शकते ?’, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.