वर्ष १९८७ मध्ये नवरात्रीच्या ४ थ्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुंबईतील सदनिकेत, त्यांच्या शेजारी रहाणारे श्री. शहा यांच्या सदनिकेत आणि त्याच मजल्यावरील परात्पर गुरु डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये कुंकवाचा सुगंध येणे अन् यासंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्यांच्या प्रश्नांची सूक्ष्मातून मिळालेली उत्तरे
(त्या काळातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून उत्तरे मिळत होती. – संकलक)
१. श्री. शहा यांच्या सदनिकेत येणारा कुंकवाचा सुगंध
अ. डॉ. आठवले : अंबाजी, घंटाकर्ण आणि श्री गणपति या तिघांची शहा उपासना करतात. त्यातील कोणत्या देवतेमुळे कुंकवाचा वास आला ?
(सूक्ष्मातून मिळालेले) उत्तर : घंटाकर्ण
आ. डॉ. आठवले : घंटाकर्णाला चंदन लावतात, कुंकू नाही. मग कुंकवाचा सुगंध का आला ?
उत्तर : घंटाकर्ण आणि अंबाजी एकच आहेत.
इ. डॉ. आठवले : चार दिवसांनी आमच्याकडे कुंकवाचा सुगंध यायला लागला. कोणत्या देवतेमुळे सुगंध आला ?
उत्तर : कुलस्वामिनी श्री योगेश्वरी.
ई. डॉ. आठवले : शहांकडे आणि आमच्याकडे एकाच वेळी दोन देवी कशा आल्या ?
उत्तर : दोन्ही देवी एकच (पार्वतीची रूपे) आहेत.
उ. डॉ. आठवले : शहांची भक्ती अधिक असल्यामुळे शहांकडे देवी आधी आली का ?
उत्तर : नाही.
ऊ. डॉ. आठवले : शहांनी बोलावल्यामुळे आली का ?
उत्तर : हो.
नंतर शहांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘गावातल्या आमच्या घरी असलेली देवीची मूर्ती मुंबईला आणावी’, असे तीन-चार मास मला प्रकर्षाने वाटत आहे. त्यानुसार मी वडीलधार्या माणसांकडे चौकशी करत आहे.’’
डॉ. आठवले : शहांकडे आणखी किती दिवस देवी रहाणार आहे ?
उत्तर : पाच दिवस.
ए. डॉ. आठवले : ‘पाच दिवस का ?’, असा प्रश्न मनात आल्यावर शहांना विचारले की, देवी येऊन किती दिवस झाले ? तेव्हा शहांनी सांगितले, ‘‘चार दिवस.’’ म्हणजे नवरात्रीमधील नऊ दिवस देवी त्यांच्याकडे रहायला आली आहे. शहांकडे मंगळवारी आणि आमच्याकडे शुक्रवारी आली. दोन्ही दिवस देवीचे आहेत.
ऐ. डॉ. आठवले : देवी आमच्याकडे किती दिवस असणार आहे ?
उत्तर : बराच काळ.
ओ. डॉ. आठवले : या काळात कुंकवाच्या वासाची प्रचीती येत राहील का ?
उत्तर : हो.
(प्रत्यक्षातही पुढे २-३ वर्षे तसे झाले. – डॉ. आठवले)
औ. डॉ. आठवले : इतरांनाही वासाची प्रचीती येईल का ?
उत्तर : हो.
(प्रत्यक्षातही पुढे २-३ वर्षे तसे झाले. – डॉ. आठवले)
अं. डॉ. आठवले : साधक आणि सात्त्विक व्यक्ती यांना प्रचीती घेण्यासाठी बोलावले तर चालेल का ?
उत्तर : हो.
१ आ. उत्तर चुकीचे वाटले, तरी त्याच्या खोलात गेल्यावर ते बरोबर आहे, हे लक्षात येणे : ३०.१२.१९८६ या दिवशी श्री. शहा यांच्या घरात येणार्या कुंकवाच्या सुवासाबद्दल विचारले असता, ‘घंटाकर्ण आणि देवी ही शक्तीचे एकच स्वरूप आहे’, असे मला उत्तर आले. आदल्या दिवशी विचारले असता, ‘घंटाकर्ण’, असे उत्तर आले होते. तेव्हा श्री. शहा म्हणाले होते, ‘‘घंटाकर्णास कुंकू वहात नाहीत, तर त्याला दुसर्या प्रकारचे चंदन वहातात. त्याचा सुगंध कुंकवासारखा नसतो.’’ ‘असे आहे, तर ‘घंटाकर्ण’ हे उत्तर का आले ?’, असा प्रश्न मला पडला. १.१.१९८७ या दिवशी ध्यानात जाऊन पुन्हा विचारले असता, ‘घंटाकर्ण आणि अंबाजी, या दोन्ही शक्ती एकच आहेत’, असे उत्तर आले. तेव्हा ध्यानात घंटाकर्ण आणि देवी, अशी दोन रूपे दिसली.
२. देवी प.पू. डॉक्टरांच्या दवाखान्यात येण्याचे कारण (वर्ष १९८७)
प.पू. डॉक्टरांच्या दवाखान्यातही अधूनमधून १-२ घंटे (तास) कुंकवाचा सुगंध येत आहे.
अ. डॉ. आठवले : दवाखान्यात पू. मलंगशहाबाबा येऊन गेल्यानंतरही वाईट शक्ती आहे का ?
उत्तर : हो.
आ. डॉ. आठवले : त्या वाईट शक्तीला घालवण्यासाठी देवी आली होती का ?
उत्तर : नाही.
इ. डॉ. आठवले : आमच्यावरील प्रेमामुळे देवी घरी आली, तशीच दवाखान्यात आली का ?
उत्तर : हो.
ई. डॉ. आठवले : ती शक्ती सहन न झाल्यामुळे त्रास होईल का ?
उत्तर : नाही.
उ. डॉ. आठवले : कुणामुळे देवी आली ?
उत्तर : जयंतामुळे. (प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्यामुळे – संकलक)
ऊ. डॉ. आठवले : देवीचे ९ दिवसांनीही वास्तव्य कसे ?
उत्तर : आवडले म्हणून.
३. उजव्या हाताने आपण प्रसाद घेतो; म्हणून प.पू. डॉक्टरांच्या उजव्या हाताला कुंकवाचा सुगंध येणे (नवरात्रीचा ४ था दिवस, १९८७ वर्ष)
डॉ. आठवले : माझ्या उजव्या हाताला कुंकवाचा सुगंध आला. फक्त उजव्या हातालाच कुंकवाचा सुगंध का आला ?
उत्तर : उजव्या हाताने आपण प्रसाद घेतो म्हणून. (शहांच्याही फक्त उजव्या हाताच्या तळव्याला अधूनमधून कुंकवाचा सुगंध येत आहे.)
|