हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियाना’ला बंगाल आणि झारखंड राज्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
कोलकाता – हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्य संघटक श्री. शंभू गवारे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी बंगाल अन् झारखंड राज्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियाना’च्या अंतर्गत नुकत्याच विविध हिंदुत्वनिष्ठांच्या भेटी घेतल्या, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या बैठकांमध्ये सहभाग घेऊन धर्मजागृती केली.
१. ‘शास्त्र धर्मप्रचार सभे’चे उपसचिव पू. डॉ. शिवनारायण सेन यांची भेट
श्री. शंभू गवारे यांनी ‘शास्त्र धर्मप्रचार सभे’चे उपसचिव आणि ‘ट्रुथ’ या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक पू. डॉ. शिवनारायण सेन अन् उपसंपादक डॉ. कौशिकचंद्र मल्लिक यांची भेट घेतली. या वेळी उभयतांना ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे निमंत्रण देण्यात आले. अधिवेशनाची वार्ता ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला.
२. ‘आंतरराष्ट्रीय वेदांत सोसायटी’च्या सत्संगामध्ये हिंदु जनजागृती समिती आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी माहिती देण्यात येणे
‘आंतरराष्ट्रीय वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंद महाराज यांची श्री. शंभू गवारे यांनी भेट घेतली आणि त्यांना समितीच्या कार्याविषयी अवगत करण्यात आले. स्वामीजींच्या आश्रमात प्रतिदिन सत्संगाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये ‘समिती आणि समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी माहिती द्यावी’, असे स्वामीजींनी सांगितले. त्यानुसार श्री. गवारे यांनी उपस्थितांना माहिती सांगितली. त्यावर उपस्थित भाविकांनी ‘तुमचे कार्य ऐकून पुष्कळ चांगले वाटले’, अशी अभिप्राय व्यक्त केले. या वेळी अनेकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेले बंगाली भाषेतील ग्रंथ खरेदी केले.
३. त्रिपुरा तथा मेघालय राज्यांचे माजी राज्यपाल तथागत राय यांची घेण्यात आली भेट !
त्रिपुरा तथा मेघालय राज्यांचे माजी राज्यपाल श्री. तथागत राय यांची श्री. शंभू गवारे यांनी भेट घेतली. श्री. राय यांनी समितीचे कार्य ऐकून कार्याचे कौतुक केले. समितीने बंगाली भाषेत प्रकाशित केलेला ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ पाहून त्यांनी ‘या ग्रंथाची आज अतिशय आवश्यकता आहे’, असा अभिप्राय व्यक्त केला. या वेळी समितीचे श्री. विकास सिंह उपस्थित होते.
४. ‘क्रिया योग आश्रम, गंगासागर’चे प्रमुख स्वामी सूर्यगिरी महाराज यांची घेतली भेट !
‘क्रिया योग आश्रम, गंगासागर’चे प्रमुख स्वामी सूर्यगिरी महाराज यांची श्री. शंभू गवारे यांनी भेट घेतली. या वेळी स्वामीजींनी समितीच्या कार्याविषयी प्रशंसोद्गार काढतांना म्हणाले, ‘‘तुमचे कार्य अतिशय चांगले आहे. तुम्ही आम्हाला पुढील मार्गदर्शन करा. तुम्ही आमच्या आश्रमात नक्की या.’’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी ऐकून स्वामीजींना पुष्कळ आनंद झाला. श्री. गवारे यांची प्रेमाने गळाभेट घेऊन ते म्हणाले, ‘‘संन्यास घेतल्यानंतर मी प्रथमच कुणाशी तरी एवढ्या आनंदाने चर्चा करत आहे.’’
५. ‘प्रेम मंदिर रिश्दा’चे स्वामी निर्गुणानंद यांची घेण्यात आली भेट !
बंगालमधील ‘प्रेम मंदिर रिश्दा’चे स्वामी निर्गुणानंद यांची श्री. शंभू गवारे यांनी भेट घेतली. तेव्हा स्वामीजी म्हणाले, ‘‘मी आणि माझे गुरुदेव तुमच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेटलो आहे. त्यांनी पनवेल येथील सनातनच्या आश्रमात आमचे स्वागत इतके सुंदर केले की, आजही ते आमच्या लक्षात आहे. तुम्ही आमच्या आश्रमात रहाण्यासाठी कधीही येऊ शकता.’’
६. विविध धर्मप्रेमींची सदिच्छा भेट घेऊन हिंदु जनजागृती समिती सध्या करत असलेल्या कार्याविषयी माहिती देणे
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. तपन घोष, ‘आत्मदीप’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अधिवक्ता प्रसून मैत्र, ‘भारतीय साधक समाज’चे संस्थापक श्री. अनिर्बान नियोगी, ‘श्रीकृष्ण सेने’चे संस्थापक श्री. विजय यादव, ‘तरुण हिंदू’ धनबादचे संस्थापक डॉ. नील माधव दास आणि श्री. उज्वल बॅनर्जी, ‘स्वदेशी जागरण मंचा’चे डॉ. पारस ठाकूर, ‘दैनिक भास्कर’ आणि ‘दैनिक विश्वमित्र’चे पत्रकार श्री. शैलेश झा, ‘पोलिट लाईव्ह’चे संपादक श्री. विद्युत् वर्मा, धर्मनिष्ठ उद्योजक श्री. राजेश अगरवाल, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. राजेश चौबे, ‘त्रिकूट बांगला’ पत्रिकेचे श्री. सागर बाग, मिदनापूर येथील धर्मप्रेमी सर्वश्री टूटन, अपूर्व दासगुप्ता, सौमेंद्र चक्रबोर्ती यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या सर्वांना समिती सध्या करत असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.
७. हिंदु राष्ट्र-जागृती बैठकांचे आयोजन
अ. ‘पश्चिम बंगेर जन्य’, बंगालचे श्री. प्रकाश दास यांनी त्यांच्या संघटनेच्या सदस्यांसमवेत एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीमध्ये स्वामी रामानंद महाराज, श्री. श्रीजन कुमार आणि श्री. अविषेक दत्त सहभागी झाले.
आ. धनबाद येथील धर्मप्रेमी श्री. जयंत मिश्रा यांनी त्यांच्या परिचित धर्माभिमानी हिंदूंसाठी एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला कथाकार स्वामी लोचन मिश्रा, सर्वश्री सुशील मिश्रा, पंकज सिंह, संजीव मिश्रा, प्रदीप पाठक, शंभू सिंह आणि अखिलेश कुमार आदी उपस्थित होते. या वेळी कथाकार स्वामी लोचन मिश्रा म्हणाले, ‘‘सध्या भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत झाले आहे. लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. तुम्हाला भगवान श्रीकृष्णानेच या कार्यासाठी निवडले आहे आणि तुमच्या माध्यमातूनच हे कार्य होणार आहे.’’
इ. फुसरो (जिल्हा बोकारो) येथील रा.स्व. संघाचे अंगवाली खंड बौद्धिक प्रमुख श्री. प्रकाश केवट यांनी संघाच्या कार्यालयामध्ये एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीमध्ये समितीच्या संकेतस्थळाशी संबंधित धर्मप्रेमी श्री. पंकज केवट, संघाचे पूर्णवेळ प्रचारक श्री. बसुकी नाथ, जिल्हा प्रशासन प्रमुख श्री. मंचू सिंह, धनबाद विभाग संयोजक श्री. शरू पंकज पांड्ये आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.