धर्मकार्याची तळमळ असलेले कोल्हापूर येथील धर्मप्रेमी पुरुषोत्तम राजाभाई पटेल (वय ७० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
कोल्हापूर, ३ एप्रिल (वार्ता.) – वयाच्या ७० व्या वर्षीही नियमित अर्पण मिळवणे, सनातन पंचांग वितरण करणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण, गुजराती भाषांतराची सेवा करणे यांसह अनेक सेवांमध्ये कार्यरत असलेले, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणारे, विनम्र असे कोल्हापूर येथील धर्मप्रेमी श्री. पुरुषोत्तम राजाभाई पटेल यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे घोषित करण्यात आले. ही घोषणा सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी २९ मार्च २०२२ या दिवशी एका सत्संगात केली. गुढीपाडव्याच्या ४ दिवस अगोदर श्रीकृष्णाने कोल्हापूर जिल्ह्याला आनंदाची भेट दिल्याने सर्वजण भावविभोर झाले. या प्रसंगी सनातनचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी श्री. पटेल यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.
सर्व काही गुरुदेवांनीच करून घेतले ! – पुरुषोत्तम पटेल
मनोगत व्यक्त करतांना श्री. पुरुषोत्तम पटेल म्हणाले, ‘‘सर्व काही गुरुदेवांनीच करवून घेतले. जे काही होते ते मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे आहे. मी विशेष असे काहीच केले नाही. दैनिक ‘सनातन प्रभात’, ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’, आणि ‘सनातन पंचांग’ हीच माझी सेवेची साधने आहेत.’’
श्री. पुरुषोत्तम पटेलकाका यांची काही विशेष गुणवैशिष्ट्ये
१. श्री. पटेलकाका यांनी आतापर्यंत ५०० जणांना ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’ डाऊनलोड करून दिले आहे.
२. श्री. पटेलकाका प्रत्येकवर्षी २०० गुजराती पंचांग समाजात वितरित करतात.
मनात म्हटलेला श्लोकही अंत:चक्षूद्वारे जाणणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! – श्री. पुरुषोत्तम पटेल
मी एकदा रामनाथी येथे साधना शिबिरासाठी गेलो होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा सत्संग आम्हाला लाभला. हा सत्संग संपल्यावर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे जाण्यासाठी निघाले, त्या वेळी मी मनातल्या मनात ‘नारायण करुणामय शरणं करवाणि तावकौ चरणौ । इति षट्पदी मदीये वदनसरोजे सदा वसतु’ (हे करुणामय नारायण, मी सगळ्या प्रकारे तुमच्या चरणी शरण आलो आहे. ही पूर्वाेक्त षट्पदी (६ पदांची स्तुती) सतत माझ्या मुखात असू दे !) हा श्लोक म्हटला. त्या वेळी गुरुदेव काही अंतर गेलेले असतांनाही ते मागे आले आणि त्यांनी मला ‘तुम्ही आता कोणता श्लोक म्हणालात असे विचारले’, यावरून मनात म्हटलेला श्लोकही अंत:चक्षूद्वारे जाणणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे प्रत्यक्ष श्री नारायणच आहेत, हे माझ्या लक्षात आले.
श्रद्धा आणि भाव यांच्या जोरावर पुरुषोत्तम पटेल जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये
दळणवळण बंदीच्या काळात लाखो लोक सामाजिक माध्यमांद्वारे सनातनशी जोडले गेले. आपल्याला साधना करून ध्येय साध्य करण्यास २० ते २५ वर्षे लागतात, ते अनेक धर्मप्रेमींनी केवळ २ वर्षांत साध्य केले. या कालावधीत झालेल्या कार्यशाळेत अनेक धर्मप्रेमींचा गुरुदेव, सनातन संस्था यांच्याप्रती उत्कट भाव असल्याचे लक्षात आले. अशाच प्रकारे श्रद्धा आणि भाव यांच्या जोरावर पुरुषोत्तम पटेल जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त झाले.
कोणत्याही सेवेसाठी तत्पर असणारे पुरुषोत्तम पटेलकाका ! – आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
श्री. पुरुषोत्तम पटेलकाका हे कोणत्याही सेवेसाठी नेहमी तत्पर असतात, तसेच अर्पण मिळवण्यातही त्यांचा पुढाकार असतो. मागील काही मासांपूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमासाठी तेलाचे डबे अर्पण हवे होते. तेव्हा त्यांनी काही घंट्यांतच त्यांच्या ओळखीच्या व्यावसायिकांना संपर्क करून तेलाचे डबे मिळवले. कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ज्या वेळी हिंदु राष्ट्र-जागृती सभा होत असत, त्या त्या वेळी श्री. पटेलकाका आवर्जून उपस्थित रहात. धर्मकार्यात ते नेहमीच उत्साही असतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |