सर्वांवर प्रीतीचा अपार वर्षाव करणारे आणि अखिल विश्वाचे परम पिता असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
१.४.२०२२ या दिवशीच्या अंकात आपण ‘आपल्या केवळ एका दृष्टीक्षेपात साधकांचे दुःख दूर करून त्यांना आनंद आणि शांती प्रदान करणारे ईश्वरस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील अनन्य प्रीती !’, यांविषयी पाहिले. आज या लेखमालेचा उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/566716.html
१३. केवळ गुरुस्मरण केल्याने संतुष्ट होऊन सूक्ष्मातून दर्शन देऊन भावानंद अनुभवायला देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्थूलदेहाला स्थळ-काळाची मर्यादा असली, तरी सूक्ष्मातून ते सततच स्वत:च्या समवेत असतात’, याची अनुभूती प्रत्येक साधक घेत आहे. व्यष्टी साधनेच्या अंतर्गत गुरुस्मरण करत असतांना मी अनुभवलेले भावक्षण येथे देत आहे. यातून ‘सर्व जिवांना चैतन्य आणि आनंद मिळून त्यांना साधना अन् गुरुचरण प्राप्ती यांची ओढ लागू दे !’, अशी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना करते.
१३ अ. दिव्य कमलासन : मी ‘गुरुस्मरण’ केल्यावर मला सूक्ष्मातून पांढऱ्या शुभ्र रंगाचे, सहस्र पाकळ्या असलेले आणि नुकतेच उमललेले ब्रह्मकमळ दिसले. ते अतिशय सुंदर, टवटवीत आणि सुकोमल दिसत होते. त्या ब्रह्मकमळात पांढराशुभ्र सदरा आणि पायजमा घातलेले परात्पर गुरु डॉक्टर उभे होते. त्यांचे तेज दिव्य होते. त्यांची अंगकांती पौर्णिमेच्या चंद्रप्रभेप्रमाणे झळकत होती. त्यांचे रूप सुंदर होते. त्यांची काया फुलासारखी कोमल आणि मोरपिसाप्रमाणे हलकी वाटत होती. परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णूचे अवतार आहेत. श्रीविष्णूची सहस्र नामे आहेत आणि त्याचे सहस्र दिव्य गुण आहेत. मला परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णु रूपात दिसत असल्यामुळे मला हे दिव्य कमलासन दिसले. ‘हे कमलपुष्प, हे प्रीतीपुष्प, म्हणजे ईश्वराची दिव्य प्रीती आणि दिव्य सहस्र गुण यांचे अधिष्ठान आहे’, या विचाराने मी त्या कमलाचे दर्शन घेत असतांना माझा भाव प्रचंड प्रमाणात जागृत झाला. त्याचे दर्शन घेत असतांना मी गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अंतर्यामी असणाऱ्या अनंत प्रीतीसागरात मनसोक्त डुंबले आणि आनंदाने न्हाऊन निघाले.
१३ आ. दिव्य श्रीचरण : परात्पर गुरु डॉक्टरांच्या श्रीचरणी त्रिवेणी (गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा) संगम झाला आहे. त्यांच्या चरणी वहाणाऱ्या प्रीतीगंगेला सहस्रधारा तीर्थाची शोभा प्राप्त झाली आहे. त्या सहस्रधारांनी ब्रह्मांडातील सर्व सजीव-निर्जीव यांचे पाप-ताप नष्ट होऊन सारे ब्रह्मांड गुरुप्रीतीची शीतलता अनुभवत आहे.
१३ इ. दिव्य करकमल : परात्पर गुरु डॉक्टर अजानुबाहू (ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत) आहेत. त्यांचे करकमल सुकोमल आहेत. ‘साधकांनी प्रत्येक कृती शिष्यभावात राहून ईश्वराला शरण जाऊन कशी करायची ? कृती चुकांरहित आणि परिपूर्ण कशी करायची ?’, हे ते स्वतःच कृती करून दाखवत आहेत. ते ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून अत्युच्च भावावस्था कशी टिकवून ठेवायची ?’, हे शिकवत असतांना मला त्यांचा कृपाशीर्वाद देणारा कोमल हस्तस्पर्श कधी मस्तक, तर कधी पाठ येथे जाणवत आहे. त्यामुळे माझे मन सकारात्मकता आणि उत्साह अनुभवत आहे.
१३ ई. दिव्य स्मितहास्य : त्यांचे निरपेक्ष प्रीतीने ओथंबलेले दिव्य स्मितहास्य ‘काळजी करू नका. प्रयत्न करा, म्हणजे जमेल’, हा त्यांचा सत्यसंकल्प व्यक्त करत साधक-जिवांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा आणि बळ देत आहे.
१३ उ. मधुर वाणी : परात्पर गुरु डॉक्टरांचे बोलणे मृदु, गोड आणि एका लयीत असते. त्यांच्या बोलण्यात एकही अयोग्य शब्द आढळत नाही. ‘ते कधी रागावून बोलले आहेत किंवा चढ्या आवाजात बोलले आहेत’, असे कधी कुणी पाहिले नाही किंवा ऐकलेही नाही. त्यांचे बोलणे म्हणजे श्रीकृष्णाची मधुर बासरी किंवा वाणीदेवतेची सुंदर वीणा यांचा गोड नाद आहे. या दैवी वाणीतून परब्रह्माचा सत्य संकल्प होत असतो. त्यांच्या विशुद्ध वाणीतून प्रीती, चैतन्य आणि आनंद यांची सरिता दुथडी भरून वहाते आणि जिवाला आध्यात्मिक संपन्नता प्राप्त करून देते.
१३ ऊ. कमलनेत्र आणि भावमुद्रा : परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण होताच आपल्या दृष्टीपुढे त्यांच्या अनेक भावमुद्रा दिसू लागतात. त्यांच्या नेत्रकमलांतून प्रीती, गुरुकृपा आणि करुणा यांचा अपरंपार वर्षाव होत असतो. या प्रीतीच्या वर्षावात सारे ब्रह्मांड भिजून चिंब होते. त्यांच्या नेत्रांतून कधी जिज्ञासा, कधी कुतूहल, कधी वात्सल्य, कधी आनंद, कधी कौतुक, कधी निरागसता, तर कधी शिष्यभाव आणि शरणागतभावही दिसतो. तरीही या सर्व भावांमागे एक स्थायीभाव आढळतो, तो म्हणजे ईश्वराची सर्व जिवांवर असलेली परम प्रीती !
१३ ए. परात्पर गुरु डॉक्टरांच्या श्रीचरणांतूनच नव्हे, तर सर्वांगांतून निरपेक्ष प्रीतीचे प्रक्षेपण होतांना दिसणे आणि त्यांच्या कृपेने जीव शांत तृप्त आणि स्थिर होत असणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या श्री चरणांतूनच नव्हे, तर सर्वांगातून निरपेक्ष प्रीतीचे प्रक्षेपण होत असते. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाने सारे वातावरण सत्शक्ती (सकारात्मक ऊर्जा), भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांनी भारित होते. प्रत्येक जीव त्याच्या क्षमतेप्रमाणे हे दैवी वातावरण ग्रहण करतो. साधना करणाऱ्या प्रत्येक जिवालाच ईश्वरप्राप्ती अन् ईश्वरप्रीती यांची तहान लागली आहे. ज्यांना गुरुकृपा लाभली, त्यांची अनेक जन्मांची तहान शमून ते शांत, तृप्त आणि स्थिर होत आहेत.
१३ ऐ. गुरुकृपा, ईश्वरत्व आणि निरपेक्ष प्रेम हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. ब्रह्मांडाचे पालन, पोषण आणि संवर्धन ज्याच्यामुळे होते, तो धर्म म्हणजे ईश्वराची निरपेक्ष प्रीतीच होय !
१३ ओ. एकाच दृष्टीक्षेपात जिवाचे सर्व दुःख, ताप, त्रास नाहीसे करून त्याला आनंद आणि शांती प्रदान करतो, तो ‘ईश्वर’ ! : ‘ईश’ या शब्दाची फोड ई + श अशी आहे. यातील ‘ई’, म्हणजे ईक्षते, म्हणजे पहातो आणि ‘श’, म्हणजे शमयती, म्हणजे शांत करतो. जो केवळ आपल्या दृष्टीक्षेपाने जिवाला शांत करतो, तो ‘ईश’ (ईश्वर) होय !
१४. श्रीकृष्णाच्या प्रीतीलीलांचे वर्णन करणारा ‘श्रीमद्भागवत’ हा ग्रंथ लिहून महर्षि व्यासांना शांती मिळणे आणि त्याच्या श्रवणाने राजा परीक्षिताला मुक्ती प्राप्त होणे
व्यास महर्षींनी अठरा पुराणे, महाभारत (‘जय’ नावाचा ग्रंथ) इत्यादी अनेक ग्रंथ लिहिले, तरी व्यासांच्या जिवाला शांती मिळाली नाही. एवढे ज्ञानी, सर्वज्ञ असूनही त्यांना काहीतरी उणीव जाणवत होती. त्यानंतर देवर्षि नारदमुनींच्या सांगण्यावरून त्यांनी श्रीकृष्ण आणि त्याच्या गोपी यांची प्रीती अन् अत्युच्च भक्ती वर्णन करणारा श्रीमद्भागवत हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर त्यांच्या जिवाला आनंद आणि शांती प्राप्त झाली. भक्तीभावाने श्रीमद्भागवताचे श्रवण केल्याने राजा परीक्षितही मोक्षाला गेला. अशा प्रकारे ‘गुरुकृपा म्हणजे ईश्वराची प्रीती आणि हेच आनंदप्राप्तीचे कारण अन् कार्यही आहे.’
१५. कृतज्ञता, क्षमायाचना आणि प्रार्थना !
परात्पर गुरु डॉक्टर, तुमची अमूल्य प्रीती तुमच्या कृपेनेच आम्हाला प्राप्त झाली आहे. तिचे वर्णन करण्यास चारही वेद (वाणी) असमर्थ आहेत. त्याचे वर्णन मी काय करणार ! तुमच्या कृपेसाठी अनंत, अनंत कृतज्ञता !
‘हे लेखरूपी कृतज्ञतापुष्प तुमच्या चरणी अर्पण करते. लेखातील चुका आणि अपूर्णता यासाठी क्षमा मागते. आता तुम्हीच सांभाळून घ्यावे आणि तुमच्या चरणी ठेवावे’, एवढीच विनवणी आहे.’
(समाप्त)
– गुरुचरणी शरणागत,
सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२१)
|