देहू (पुणे) येथे १ एप्रिलपासून पुन्हा मांस आणि मच्छी विक्रीस बंदी, उल्लंघन केल्यास कारवाई !
देशातील प्रत्येक तीर्थस्थानी अशा प्रकारची बंदी घालण्याचा आदेश केंद्र सरकारने द्यावा, असेच हिंदूंना वाटते. – संपादक
पुणे – येथील देहू ही संत तुकाराम महाराजांची नगरी असल्याने १ एप्रिलपासून पुन्हा एकदा मांस आणि मच्छी विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. यापूर्वी ग्रामपंचायत असतांना ही त्याची कार्यवाही चालू होती. त्यानंतर नवनिर्मित देहू नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारणसभेत हा निर्णय घेण्यात आला असून त्याची कार्यवाही चालू झाली आहे. आता याचे कुणी उल्लंघन केल्यास न्यायालयीन कारवाई केली जाणार असल्याची माहिती देहू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी दिली आहे.
पूर्वीच्या ग्रामपंचायतीमधील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मांसाहारावर अनेकांनी भर दिला. त्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक बसले असतांना मांस आणि मच्छी विक्री चालू होती; पण ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाले, त्यानंतरच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा मांस आणि मच्छी विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव पुढे आला आहे.