संपूर्ण जिल्ह्यात नव्हे, तर केवळ मंदिराजवळील मांस विक्रीच्या दुकानांवर बंदी ! – गाझियाबादच्या महापौरांचे स्पष्टीकरण
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – गाझियाबादमध्ये संपूर्ण जिल्ह्यात चैत्र नवरात्रीच्या काळात मांस विक्रीची दुकाने बंद करण्याचा लेखी आदेश महापौर आशा शर्मा यांनी दिला होता; मात्र अवघ्या १२ घंट्यांत त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. हा आदेश केवळ मंदिरांजवळील दुकानांसाठी असल्याचा सुधारित आदेश त्यांनी दिला आहे. प्रसारमाध्यमांनी संपूर्ण जिल्ह्यात बंदी घातल्याचे चुकीचे वृत्त प्रसारित केल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.
१. महापौर शर्मा यांनी सांगितले की, आम्हाला राज्य सरकारकडून आदेश आल्यानंतर मंदिरांजवळील सर्व दुकाने बंद केली आहेत. मांस आणि मद्य यांच्यात कोणतीही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे मद्याच्या दुकानांविषयी आमचा कोणताही आक्षेप नाही.
२. दुकानदारांचे म्हणणे होते की, यापूर्वी कधीही अशा प्रकारचा आदेश देण्यात आला नव्हता. जर दुकानांवर बंदी घालायचीच होती, तर मद्याची दुकानेही बंद करायला हवी होती. ती चालूच ठेवण्यात आली आहेत.