पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील अविश्‍वासदर्शक ठराव फेटाळला  

  • पाकिस्तानची संसद विसर्जित : ९० दिवसांत निवडणुका

  • ठरावावर उपसभापतींनी मतदान होऊ दिले नाही

  • ठराव फेटाळल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी आणलेला विश्‍वासदर्शक ठराव ३ एप्रिल या दिवशी पाकच्या संसदेने फेटाळून लावला. संसदेचे उपसभापती कासीम खान सूरी यांनी या अविश्‍वासदर्शक ठरावाच्या मागे विदेशी षड्यंत्र असल्याचा आरोप करत हा ठराव फेटाळला. त्यांनी यावर मतदान होऊ दिले नाही. यानंतर त्यांनी संसद २५ एप्रिलपर्यंत स्थगित केली. यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी संसद विसर्जित करण्याची विनंती राष्ट्रपतींकडे केली. राष्ट्रपतींनी खान यांची ही विनंती मान्य करत संसद विसर्जित केली, तसेच पुढील ९० दिवसांत सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा आदेश दिला. तोपर्यंत पंतप्रधान इम्रान खान हे हंगामी पंतप्रधान म्हणून काम पहातील,  असेही सांगितले.

संसदेत ठराव फेटाळल्यानंतर विरोधी पक्षांनी प्रचंड गोंधळ घातला. सत्ताधारी पक्षाचे सदस्य सभागृहातून बाहेर पडल्यानंतर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा संसदेचे कामकाज चालू केले. त्यांना एका सदस्याला सभापती म्हणून निवडले. त्यानंतर या अविश्‍वास दर्शक ठरावावर मतदान घेतले आणि ठराव संमत केला. त्यापूर्वी ठराव फेटाळल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणाही विरोधी पक्षांनी केली.

मी जनतेचे अभिनंदन करतो आणि अल्लाचे आभार मानतो ! – इम्रान खान

अविश्‍वास ठराव फेटाळल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित करतांना म्हटले की, सगळ्या जनतेसमोर एक देशद्रोह होत होता. देशद्रोही बसलेले होते आणि षड्यंत्र रचले जात होते. मी त्यांना संदेश देऊ इच्छितो की, अल्लाचे जनतेकडे लक्ष आहे. अशाप्रकारचे षड्यंत्र जनता यशस्वी होऊ देणार नाही. सभापतींनी आज त्यांच्या अधिकारांचा वापर करून निर्णय दिला आहे. त्यानंतर मी आताच राष्ट्रपतींना सूचना पाठवली आहे की, सभागृह विसर्जित करा. एका लोकशाही समाजात आपण लोकशाही जनतेकडे जावे, निवडणुका व्हाव्यात जनता निर्णय घेईल. तसेच पैशांच्या बळावर या देशाच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. त्यांचा सर्व पैसा वाय जाईल. जनतेने हा निर्णय घेतलेला आहे आणि मी जनतेला आज सांगतो की, निवडणुकीची सिद्धता करा, तुम्हीच निर्णय घ्यायचा आहे. मी जनतेचे अभिनंदन करतो आणि अल्लाचे आभार मानतो की, एवढे मोठे षड्यंत्र रचले जात होते, जनतेने निवडून दिलेल्या सरकारला पाडण्याचा प्रयत्न झाला, तो आज अयशस्वी ठरला आहे.

राज्यघटनेचे उल्लंघन ! – शाहबाज शरीफ

संसदेत अविश्‍वादर्शक ठरावाच्या विरोधात मतदान न घेणे, हे राज्यघटनेचे उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षांचे नेते तथा पंतप्रधान पदाचे उमेदवार शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केली.