सध्याच्या काळातील समाजाच्या सर्व प्रकारच्या दुर्दशेवर हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय ! – राममूर्ती अग्निहोत्री, ज्योतिष अभ्यासक, वृंदावन

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा (उत्तरप्रदेश) येथून हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राचा शंखनाद !

दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, श्री. राममूर्ती अग्निहोत्री, श्री. जगदीश भाटिया

मथुरा (उत्तरप्रदेश) – हिंदु कधीही आणि कुणाला धर्मांतरित करत नाही. ज्याला आनंदी जीवन जगायचे असेल, तर त्याने सनातन धर्माचे पालन केले पाहिजे. फक्त हिंदु धर्मच सर्वांच्या कल्याणाची चर्चा करतो. साधना केल्यानेच हिंदु धर्माचे माहात्म्य कळू शकते आणि आनंद अनुभवता येतो. सध्याच्या काळात आधिदैविक, आधिभौतिक आणि आधिआध्यात्मिक समस्या अन् समाजाच्या दुर्दशेवर हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन वृंदावन येथील ज्योतिष अभ्यासक श्री. राममूर्ती अग्निहोत्री यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मार्च २०२२ या दिवशी मथुरा येथे आयोजित करण्यात आलेले हिंदु राष्ट्र अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अधिवेशनाला मथुरेमध्ये कार्य करणाऱ्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक असे अनेक जण उपस्थित होते.

अधिवेशनाच्या प्रारंभी श्री. राममूर्ती अग्निहोत्री, मथुरा येथील धर्मप्रेमी श्री. जगदीश भाटिया आणि समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या अधिवेशनामध्ये ‘अखिल भारतीय गुर्जर महासभे’चे मथुरा जिल्हा अध्यक्ष कॅप्टन हरचरण सिंग गुर्जर, ‘प्राचीन कृषी विज्ञान (हाथरस)’ केंद्राचे येथील श्री. नरेंद्र सिंह आणि ‘भारत विकास परिषदे’चे श्री. प्रकाश वीर सोळंकी यांनी उपस्थित धर्मप्रेमींना संबोधित केले. या वेळी यमुना नदीच्या रक्षणासाठी कार्य करणारे ‘प्रोजेक्ट आत्मनिर्भर संस्थान’चे संस्थापक अन् उद्योजक श्री. रंजित चतुर्वेदी पाठक हेही उपस्थित होते. या अधिवेशनाच्या नंतर झालेल्या गटचर्चेत हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ‘असे कार्यक्रम नियमित होणे आवश्यक आहे’, असे मत व्यक्त केले.

संभाव्य युद्धकाळाला तोंड देण्यासाठी हिंदू समाजाने शिस्त, कार्यपद्धत आदी गुण आत्मसात करणे आवश्यक ! – (निवृत्त) कॅप्टन हरचरण सिंग गुर्जर, जिल्हा अध्यक्ष, अखिल भारतीय गुर्जर महासभा, मथुरा

संभाव्य युद्धकाळाला तोंड देण्यासाठी हिंदू समाजाने शिस्त, कार्यपद्धत आदी गुण आत्मसात करणे आवश्यक आहे. रशिया, युक्रेन यांच्यासारखी परिस्थिती भारतात भविष्यात कधीही होऊ शकते. जागतिक स्तरावर होत असलेल्या घडामोडींवरून अणूयुद्ध फार दूर नाही, अशी लक्षणे दिसत आहेत. अण्वस्त्रांच्या उत्सर्जनापासून रक्षण होण्यासाठी उपाययोजना करणे आणि प्रथमोपचार, स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध होणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत सरकारवर विसंबून न रहाता आपण स्वावलंबी व्हावे. त्यामुळे समिती राबवत असलेले सर्व उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहेत.

आपण अद्यापही आर्थिक, सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या स्वतंत्र झालेलो नाहीत ! – नरेंद्र सिंह, प्राचीन कृषी विज्ञान, हाथरस

आज १०० कोटी हिंदूंची गंगा माता प्रदूषित झाली आहे आणि ती स्वच्छ करण्यासाठी हिंदू समाज काहीच करत नाही. वर्ष १९४७ मध्ये फक्त सत्तेचे हस्तांतरण झाले; परंतु आपण अद्यापही आर्थिक, सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या स्वतंत्र झालेलो नाहीत. आपल्या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली असली, तरी सत्ता मात्र निधर्मी लोकांकडे हस्तांतरित झाली आणि त्यामुळे इंग्रजांनी केलेली व्यवस्था आजही आहे.

हिंदू संघटित झाल्यास राष्ट्ररक्षणाचे कार्य होऊ शकते ! – प्रकाश वीर सोळंकी, भारत विकास परिषद

आपल्याला जातीपातीमध्ये विभाजित करून गुलाम बनवले गेले आणि आजही हे षड्यंत्र चालू आहे. आज राष्ट्ररक्षणाचे कार्य अत्यंत आवश्यक आहे आणि आपण (हिंदू) संघटित झालो, तरच हे कार्य होऊ शकते.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात हिंदूंनी संघटितपणे सहभागी व्हावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आज हिंदु समाज जातपात, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांमध्ये विखुरलेला आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने आपण आपले सर्व भेद विसरून एक हिंदु म्हणून हिंदु  राष्ट्र स्थापनेच्या दिशेने कार्य करण्यासाठी एकत्र आलो आहोत. असे एकत्रित येणे, हा सर्वोत्तम लाभ आजच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून झाला आहे. एखाद्या लढाईमध्ये लढणाऱ्या सैनिकांचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व सैनिकांना रसद पुरवणाऱ्या सैनिकांचे आहे. त्याप्रमाणेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणाऱ्या सर्व हिंदूंचा सहभाग महत्त्वाचा आहे. सद्यःस्थितीत राष्ट्र आणि धर्म यांची परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक असून त्या कार्यात हिंदूंनी संघटितपणे सहभागी व्हावे.