हिदूंचा नववर्षारंभ शोभायात्रा आणि गुढीपूजन यांनी साजरा !

  • हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी सामूहिक गुढीपूजन आणि शोभायात्रेत सहभाग !

  • मुंबई आणि पालघर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा ७ ठिकाणी आदर्श गुढीपूजन आणि ४ ठिकाणी शोभायात्रेत सहभाग !

  • माहीम येथील शोभायात्रेत स्वरक्षण प्रात्यक्षिके !

श्रीकृष्ण मंदिर, प्रतापनगर, भांडुप (प.) येथे गुढीपाडव्याविषयी माहिती सांगताना  धर्मप्रेमी कु. ईश्वरी गुजर

मुंबई – येथील गोरेगाव, माहीम, घाटकोपर, कांजुरमार्ग, भांडुप, नवी मुंबई येथील नेरूळ आणि पालघर जिल्ह्यातील वसई येथे विविध संघटनांच्या वतीने सामूहिक गुढी पूजन करण्यात आले. या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यानाद्वारे प्रबोधन करण्यात आले. बोरीवली (पूर्व आणि पश्चिम), मालाड, माहीम, सानपाडा (नवी मुंबई) येथे काढण्यात आलेल्या हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत हिंदु जनजागृती समितीचे प्रतिनिधी आणि सनातन संस्थेचे साधक सहभागी झाले होते. माहीम येथील शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.


ठाणे जिल्ह्यातही शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचे उत्साहात स्वागत

ठाणे, २ एप्रिल (वार्ता.) – राज्यशासनाने कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे रहित केल्यानंतर तब्बल २ वर्षांनी  ठाणे जिल्ह्यात हिंदु नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ठाणे, डोंबिवली आणि कल्याण येथे नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांचे चित्ररथ स्वागतयात्रेचे विशेष आकर्षण ठरले. ढोल-ताशे आणि लेझीम पथक, तसेच पारंपरिक वेश परिधान करून नागरिक या स्वागतयात्रांत सहभागी झाले होते. चौकाचौकांत आणि मुख्य रस्त्यांवर काढलेल्या भव्य रांगोळ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

भिवंडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन !

धर्माभिमान्यांनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा !

भिवंडी येथील पद्मनगर भागातील राममंदिर परिसरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढी उभारण्यात आली होती. या वेळी येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या हिंदु धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा केली, तसेच डायघर भागातील उत्तरशिव या गावातही तेथील ग्रामस्थ आणि समितीच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक गुढी उभारली.


कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सामूहिक गुढीद्वारे जागवले हिंदूतेज !

उजळाईवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री गणेश मंदिराच्या प्रांगणात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना  श्री. किरण दुसे
उजळाईवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे सामूहिक गुढीसाठी उपस्थित धर्मप्रेमी

कोल्हापूर, २ एप्रिल (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सामूहिक गुढीद्वारे हिंदूतेज जागवण्यात आले. उजळाईवाडी येथे श्री गणेश मंदिराच्या प्रांगणात माजी उपसरपंच श्री. बाबासाहेब माने आणि माजी पोलीस अधिकारी श्री. बाबासाहेब कारदगे यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. प्रारंभी प्रार्थना घेण्यात आली, तर शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी गुढीपाडव्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी उजळाईवाडी आणि शिरोली येथील प्रशिक्षणवर्गातील युवक, युवती यांसह अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

जत्राट (कर्नाटक) येथे श्री शिव गणेश मंदिर येथे सामूहिक गुढीच्या प्रसंगी उपस्थित धर्मप्रेमी

१. जत्राट (कर्नाटक) येथे श्री शिव गणेश मंदिर येथे सामूहिक गुढीचे आयोजन करण्यात आले होते. येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. जुगलकिशोर वैष्णव यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.  येथील धर्मप्रेमी सर्वश्री दीपक भिवशे, प्रवीण कोकणे, सोमनाथ चौगुले, प्रथमेश कोळी यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास पाळला होता. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. जुगलकिशोर वैष्णव आणि धर्मप्रेमींच्या हस्ते या सर्वांना गोड पदार्थ देऊन मासाची समाप्ती करण्यात आली.

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री विठ्ठल मंदिर येथे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना वैद्य संजय गांधी

२. मलकापूर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे मलकापूर येथील प्रतिष्ठीत व्यापारी श्री. सुभाष पाथरे यांच्या हस्ते सामूहिक गुढीचे पूजन करण्यात आले. या वेळी ‘शैलेश नर्सरी’चे मालक श्री. सुबोध भिंगार्डे, माजी नगराध्यक्ष श्री. राजू भोपळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे वैद्य संजय गांधी यांनी हिंदु नववर्ष आणि गुढीपाडवा यांचे महत्त्व विशद केले.


सांगली जिल्ह्यात सामूहिक गुढीसाठी धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठांचा सक्रीय सहभाग !

 

पलूस (जिल्हा सांगली) येथे सामूहिक गुढीच्या प्रसंगी उपस्थित धर्मप्रेमी

सांगली –  सांगली जिल्ह्यात सामूहिक गुढीसाठी धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठांचा सक्रिय सहभाग होता. पलूस येथे श्री धोंडिराम समाधी मंदिराच्या परिसरात सामूहिक गुढीचे पूजन सौ. कल्याणी आणि श्री. मानसिंग फडनाईक-इनामदार दांपत्याच्या हस्ते करण्यात आले. धर्मप्रेमी श्री. गणेश बुचडे यांची प्रतिज्ञा सांगितली, तर धर्मप्रेमी श्री. शरद पाटील उपस्थित होते. पूजाविधीचे सर्व साहित्य धोंडिराम समाधी मंदिराचे प्रमुख श्री. कुमार रायाजी पाटील यांनी उपलब्ध करून दिले.

कुंडल (जिल्हा सांगली) येथे सामूहिक गुढीच्या प्रसंगी उपस्थित धर्मप्रेमी, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

१. कुंडल येथे श्रीराम मंदिरासमोर सौ. सुजाता आणि श्री. विठ्ठल ठोके दांपत्याच्या हस्ते सामूहिक गुढीचे पूजन करण्यात आले.

२. तुजारपूर येथे धर्मशिक्षणवर्गात येणाऱ्या महिलांनी पुढाकार घेऊन सामूहिक गुढी उभी केली.

ईश्वरपूर येथे श्री सद्गुरु धोंडिराम महाराज समाधी मंदिर येथे उभारण्यात आलेल्या सामूहिक गुढीप्रसंगी विविध मान्यवर
ईश्वरपूर येथे श्री सद्गुरु धोंडिराम महाराज समाधी मंदिर येथे उभारण्यात आलेल्या सामूहिक गुढीप्रसंगी विविध मान्यवर

३. ईश्वरपूर येथे श्री सद्गुरु धोंडिराम महाराज समाधी मंदिर येथे सामूहिक गुढी उभारण्यात आली होती. या वेळी अध्यक्ष श्री. सुभाष पाटील, धर्मप्रेमी श्री. अधिकराव मोरे, मंदिराचे विश्वस्त, सेवेकरी, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दाखवण्यात आलेली प्रात्यक्षिके ठरली ठाणेकरांचे आकर्षण !

ठाणे येथे गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागतयात्रेत हिंदु जनजागृती समितीचा चित्ररथही सहभागी झाला होता. या वेळी समितीच्या वतीने स्वरक्षणार्थ दाखवण्यात आलेली दंडसाखळी, लाठीकाठी आणि कराटे यांची प्रात्यक्षिके नागरिकांचे विशेष लक्ष वेधत होती. या वेळी समितीच्या वतीने विनामूल्य चालू असलेल्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. यासमवेत राष्ट्र-धर्म विषयक प्रबोधन करणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. नववर्ष स्वागतयात्रेच्या गुढीचे नौपाडा परिसरात २ ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूजन करण्यात आले.

ठाणे येथील वर्तकनगर येथे काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागतयात्रेतही समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


भोर (पुणे) येथे कृतीशील धर्मप्रेमींनी उभारली सामूहिक गुढी !

भोर (पुणे) – येथील खंडोबाची वाडी तालुका भोर येथे मारुति मंदिरासमोर धर्मशिक्षणवर्गातील कृतीशील धर्मप्रेमींच्या पुढाकाराने सामूहिक गुढी उभारण्यात आली. गुढीचे पूजन उपसरपंच श्री. राजेश सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. धर्मप्रेमी श्री. रवींद्र गाडे यांनी सामूहिक प्रार्थना सांगितली.


हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यात सामूहिक गुढीद्वारे जागवली हिंदूचेतना !

श्री दुर्गामाता मंदिर, पंचपाळी हौद सातारा, राजवाडा येथे उभारण्यात आलेल्या सामूहिक गुढीच्या ठिकाणी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
वडूज येथे बसस्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या सामूहिक गुढीच्या ठिकाणी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

सातारा, २ एप्रिल (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री दुर्गामाता मंदिर, पंचपाळी हौद सातारा, राजवाडा येथे उभारण्यात आलेल्या सामूहिक गुढीच्या प्रसंगी हिंदु महासभा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य श्री. उमेश गांधी, योग वेदांत समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. सतीश केसकर, बजरंग दलाचे श्री. मुकुंद पंडित उपस्थित होते. वडूज येथे बसस्थानकाजवळ सामूहिक गुढी उभारण्यात आली. या वेळी वडगाव येथील विठ्ठल महाराज आणि जयराम स्वामी, वाकळवाडी येथील दादा महाराज, वाकेश्वर येथील फडतरे महाराज, गोविंद भंडारे, महसूल अधिकारी निवास कदम, वार्ताहर अमर फडतरे, भाजपचे अमर जाधव, निवृत्त पंचायत समिती अधिकारी दिघे यांसह अन्य उपस्थित होते.


संभाजीनगर येथे घोडे, उंट, चित्ररथ, सजीव-निर्जीव देखावे यांच्यासह भव्य शोभायात्रा !

हिंदुत्वनिष्ठांच्या फेरीमध्ये हिंदु जनजागृती समितीचा धर्मध्वज आणि कापडी फलक

संभाजीनगर, ३ एप्रिल (वार्ता.) – गुढीपाडव्याच्या निमित्त शहरात पारंपरिक पद्धतीने घोडे, उंट, चित्ररथ, सजीव-निर्जीव देखावे यांच्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या धर्मध्वजाच्या पूजनाने शोभायात्रेचा आरंभ झाला. या वेळी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार दानवे, तसेच साहाय्यक पोलीस उपायुक्त वनिता बनकर, महापौर नंदकुमार घोडीले उपस्थित होते, तसेच पारंपरिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणात शिवसेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते अन् संप्रदाय यांचे अनुयायीही सहभागी झाले होते. प्रथेप्रमाणे या वर्षीही गुढीपाडव्याची भव्य शोभायात्रा शहराचे आराध्य दैवत राजाबाजार येथील श्री संस्थान गणपति येथून चालू झाली. श्रीरामाचे नामस्मरण करत शनी संप्रदायच्या डॉ. विभाश्रीदीदीजी यांच्या अमृतवाणीने या शोभायात्रेचा समारोप खडकेश्वर शिवमंदिर येथे झाला.


रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त सामूहिक गुढीपूजन !

तुकसई येथे आदर्श गुढी उभारून घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ  !

येथील तुकसई गावात उपसरपंच समीर पांगारे आणि सौ. पांगारे यांच्या हस्ते आदर्श गुढी उभारून तिचे पूजन करण्यात आले. खोपोली येथील धर्मप्रेमी श्री. किशोर पडवळ यांनी पूजा सांगितली आणि उपस्थित हिंदूंकडून हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली.

कळंबोली येथे विविध राजकीय पक्षांच्या सहभागाने आदर्श सामूहिक गुढी उभारली !

कळंबोली येथील गुढीपाडवा सांस्कृतिक आणि सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने सामूहिक गुढी उभारण्यात आली. सनातनचे साधक दांपत्य श्री. मुकुंद मांढरे आणि सौ. मोहिनी मांढरे यांनी या गुढीचे पूजन केले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. शेकापचे नगरसेवक गोपाळ भगत, कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, स्थायी समिती सभापती अमर पाटील, शिवसेना विभागप्रमुख कृष्णा कदम, बांधकाम व्यावसायिक आणि समाजसेवक राहुल हजारे, भाजपचे अशोक मोटे, महिला बालकल्याण समितीच्या सौ. प्रिया मुकादम आणि गुढीपाडवा सांस्कृतिक अन् सामाजिक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिरढोण येथील शोभायात्रेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग !

शिरढोण येथे सनातननिर्मित श्रीरामाचे चित्र बैलगाडीत ठेवून काढलेली शोभायात्रा

शिरढोण गावात गुढीपाडव्यानिमित्त प्रभु श्रीरामाच्या चित्राच्या रथासह शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हिंदु बंधू-भगिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. या वेळी प्रभु श्रीराम, हिंदु राष्ट्र यांचा जयघोष करण्यात आला. या शोभायात्रेमध्ये सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सनातन संस्थेच्या वतीने या ठिकाणी गुढी उभारण्यामागील शास्त्रीय माहिती सांगण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त गावांत ठिकठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने संताचे श्लोक असलेले फलक लावण्यात आले होते. हे फलक मार्गस्थांचे लक्ष वेधून घेत होते.


सोलापूर येथे ठिकठिकाणी उभारण्यात आली सामूहिक गुढी !

सोलापूर येथील शेळगी भागातील शिव-मारुति मंदिर येथे सामूहिक गुढीचे दर्शन घेतांना धर्मप्रेमी
सोलापूर येथील गणेश मंदिर येथे धर्मप्रेमी महिलांनी उभी केली सामूहिक गुढी

सोलापूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथील शेळगीमधील शिव मारुति मंदिर, रामदेवनगर येथील श्री गणेश मंदिर, रामराज्यनगर, बालाजी व्हिलाज, सर्वाेदयनगर, माधवनगर येथील साई मंदिर, तसेच बार्शी येथील भगवंत मंदिर, शिरसोडी (जिल्हा पुणे) यांसह १२ ठिकाणी धर्मप्रेमी नागरिक आणि महिला यांनी सामूहिक गुढी उभारली. या वेळी उपस्थितांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोलापूर येथील जुने घरकूल येथील श्री यल्लम्मा मंदिर येथे समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी हिंदूंवर होणारे आघात, धर्मशिक्षणाचे महत्त्व आणि हिंदु धर्माचे महत्त्व सांगितले, तसेच या ठिकाणी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली.

लातूर येथील ओंकार हनुमान मंदिर येथे उभारण्यात आलेली सामूहिक गुढी

लातूर – येथील ओंकार हनुमान मंदिर येथे समितीच्या वतीने सामूहिक गुढी उभी करण्यात आली, तसेच येथील नववर्ष शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

जळगाव आणि धुळे येथे सामूहिक गुढीपूजन !

जळगाव – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चोपडा आणि यावल (जिल्हा जळगाव) येथे धर्मप्रेमींनी मिळून सामूहिक गुढीपूजन केले. सनातन संस्थेच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त जळगाव जिल्ह्यात सामूहिक गुढी उभारणे, भित्तीपत्रके लावणे, फलकलेखन करणे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना शुभेच्छा देत धर्मप्रसार करण्यात आला. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव शहरातील टॉवर चौक, जुना खेडी रोड, तसेच मोठा वाघोदा, यावल, आवार, खर्ची, पाळधी, एकलग्न, चोपडा आणि नंदुरबार येथे सामूहिक गुढी उभारून ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची’ प्रतिज्ञा घेण्यात आली. सनातन संस्थेच्या वतीने पाचोरा येथील शिवसेना आमदार किशोर (आप्पा) पाटील, तसेच फेकरी गावच्या सरपंच सौ. चेतना भिरुड यांची सदिच्छा भेट घेत त्यांना हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. जळगाव शहरातील ऑटो रिक्शावर गुढीपाडव्याचे शास्त्र सांगणारी ५० पत्रके लावून धर्मप्रसार करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी असलेले ५ फलक लिहून जनजागृती करण्यात आली.


विदर्भात ४ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन आणि अकोला येथे शोभायात्रेत सहभाग !

अकोला, अमरावती, सेलू (जिल्हा वर्धा) आणि नांदुरा (जिल्हा बुलढाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. अकोला येथे शोभायात्रेत समितीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

नाशिक येथील गाजरवाडी येथे सामूहिक गुढी उभारून ग्रामस्थांची हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा !

निफाड (जिल्हा नाशिक) – जिल्ह्यातील गाजरवाडी येथे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक गुढी उभारून ग्रामस्थांनी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेतली.

या वेळी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. बाजीराव सालके यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. भावपूर्ण वातावरणात गुढीपूजन झाले. ‘शास्त्रशुद्ध पद्धतीने गुढी कशी उभारायची ?’, ‘त्यामधील शास्त्र काय आहे ?’, हे हिंदु जनजागृती समितीच्या प्रियंका शिंदे आणि वैष्णवी गाजरे यांनी सांगितले. नंतर गुढीला भावपूर्ण प्रार्थना करण्यात आली आणि शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्वांनी एकत्रित प्रतिज्ञा केली. समितीच्या कु. प्रियंका शिंदे यांनी प्रतिज्ञा सांगितली आणि त्यांच्यामागे सर्व ग्रामस्थांनी ती म्हटली.

समितीचा ‘सामूहिक गुढीपूजन’ हा उपक्रम पुष्कळ आवडल्यामुळे ‘प्रतिवर्षी हा उपक्रम राबवण्यात येईल’, असे ग्रामस्थांनी सांगितले.

विशेष !

‘हिंदु राष्ट्रा’विषयीची सर्व लोकांना माहिती व्हावी यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सनातननिर्मित आणि हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत हिंदु राष्ट्रविषयक ग्रंथांचे पूजन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी हे ग्रंथ वाचण्याचा संकल्प केला.

क्षणचित्र

यानंतर सर्व जण ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र’ अशी घोषणा देत असल्यामुळे उत्साहपूर्ण वातावरण सिद्ध झाले होते.