हिंदूंच्या नववर्षारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध ठिकाणी शोभायात्रांतून हिंदूंचे एकत्रीकरण !
|
मुंबई – येथे गिरगावसह विविध ठिकाणी, तसेच डोंबिवली, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर, अकोला, संभाजीनगर यांसह अन्य शहरांत चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात् गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर हिंदूंनी एकत्र येत शोभायात्रा, मिरवणुका किंवा दुचाकींवरून फेऱ्या काढल्या. पारंपरिक पोषाखात, पारंपरिक वाद्यांच्या गजरात हिंदू बहुसंख्येने या मिरवणुकांमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते.
काही ठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनीही या शोभायात्रेत सहभाग घेतला. एकूण ५० हून अधिक ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी यांसह सामूहिक गुढीपूजन करण्यात आले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघालेल्या या मिरवणुकांत भगवे ध्वज, घोषणा, जयघोष, तसेच लेझीमसारख्या खेळातून सांस्कृतिक प्रदर्शन आणि लाठ्या-काठ्या यांसारखी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके यांसह मिरवणुकींच्या माध्यमातून झालेले हिंदूंचे संघटन लक्षवेधी ठरले !