सीबीआयने गमावलेली विश्वासार्हता परत मिळवण्यासाठी राजकारण्यांशी संबंध तोडवेत !
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी सीबीआयला सुनावले !
भारताचे सरन्यायाधीशच थेट अशा प्रकारचे विधान करतात, याचा अर्थ केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांची बटीक बनून त्यांच्या आदेशानुसार कार्य करत आल्या आहेत. यामुळे अपराध्यांना मोकळीक, तर निरपराध्यांवर कारवाई केली जाते, हे स्पष्ट होते !
नवी देहली – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) त्याची विश्वासार्हता गमावली आहे. जर तुम्हाला विश्वासार्हता परत मिळवायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला राजकारण्यांशी संबंध तोडावे लागतील आणि विश्वासार्हता पुन्हा मिळवण्यासाठी पुन्हा काम करावे लागेल, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केले. ‘लोकशाहीतील अन्वेषण यंत्रणेची भूमिका आणि दायित्व’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
सरन्यायाधीश पुढे म्हणाले,
१. शासनकर्ते काळासमवेत पालटतील; पण तुम्ही (सीबीआय) कायम आहात.
२. पोलिसांची कार्यशैली आजही ब्रिटीशकालीन आहे. ती पालटण्याची आवश्यकता आहे.
३. सीबीआयसह सर्व अन्वेषण यंत्रणांना एका छताखाली आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वायत्त अन्वेषण यंत्रणा बनवायला हवी. याचे दायित्व स्वतंत्र व्यक्तीकडे द्यावे.
४. केंद्रीय यंत्रणांकडे कामाचा भार अधिक आहे, तसेच त्यांच्याकडे साधनांची तीव्र कमतरता आहे. सीबीआयकडे आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित अधिकारी यांसह पायाभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकवेळा खटला चालवणे अवघड होते.