श्रीलंकेत आणीबाणी लागू !

राष्ट्रपती गोटबाय राजपक्षे

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेमधील आर्थिक संकटामुळे नागरिकांकडून होत असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे देशात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वीच नागरिकांनी राष्ट्रपती गोटबाय राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर हिंसक आंदोलन केले होते. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्य तैनात करण्यात आले आहे. सध्या देशात तणावाची स्थिती आहे.

श्रीलंकेच्या दुःस्थितीला सत्ताधारी राजपक्षे कुटुंब उत्तरदायी !

श्रीलंकेच्या या दुःस्थितीला सध्याचे गोटबाय राजपक्षे यांचे कुटुंब उत्तरदायी असल्याचे सांगितले जात आहे. या कुटुंबातील ५ जण सरकारमध्ये विविध खात्यांचे मंत्री आहेत. त्यांच्या अदूरदर्शी कारभारामुळेच श्रीलंकेत ही स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे संकट आणि विदेशी कर्ज यांमुळे श्रीलंकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. सरकारने या स्थितीकडे अजिबात लक्ष दिले नाही. भ्रष्टाचार आणि आर्थिक बेशिस्त यांचाही परिणाम झाला. आर्थिक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने सातत्याने विदेशी कर्ज घेतले. त्यातच विदेशी चलनाची गंगाजळी अल्प झाली.

कोरोनाचा परिणाम !

कोरोनाच्या काळात सर्व काही ठप्प झाल्याने येथील मुख्य व्यवसाय असलेल्या पर्यटनावर त्याचा मोठा परिणाम झाला. यामुळे सहस्रो लोक बेरोजगार झाले. सध्या श्रीलंकेमध्ये ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना बाजारात साहित्यच उपलब्ध नसल्याने काही विकतही घेता येत नाही. पेट्रोपंपवर इंधनच नाही. देशात १३ घंटे वीज कपात केली जात आहे. जनित्रे (जनरेटर्स) चालवण्यासाठी डिझेलच उपलब्ध नाही. सार्वजनिक परिवहन व्यवस्था कोलडली आहे.