जर काही देश इस्लामी किंवा ख्रिस्ती घोषित होऊ शकतात, तर नेपाळ ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का होऊ शकत नाही ?
नेपाळचे पर्यटनमंत्री प्रेम अले यांचा प्रश्न
काठमांडू (नेपाळ) – जर काही देश इस्लामी किंवा ख्रिस्ती घोषित करता येत असेले आणि तेथील लोकशाही व्यवस्थाही कायम रहात असेल, तर नेपाळला लोकशाहीप्रधान ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का केले जाऊ शकत नाही ?, असा प्रश्न नेपाळचे पर्यटन मंत्री प्रेम अले यांनी येथील ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’च्या कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीत उपस्थित केला. या बैठकीला नेपाळ, भारत, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, अमेरिका, जर्मनी, ब्रिटन यांसह १२ देशांचे १५० प्रतिनिधी उपस्थित होते. ‘मी नेपाळी काँग्रेस, सीपीएन्-माओइस्ट सेंटर, सीपीएन्-यू.एम्.एल्. आणि मधेसी दल यांना नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी पुढे यावे’, असे आवाहनही अले यांनी या वेळी केले. जगातील एकमेव हिंदु राष्ट्र असणार्या नेपाळला वर्ष २००८ मध्ये ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित करण्यात आले.
Stating that the rise of a political party depends on the people, he said that RPP Nepal is not in favor of an active monarchy but in favor of a Hindu nation. #Nepal #politics #politicianshttps://t.co/3XcsY08RrF
— República (@RepublicaNepal) March 30, 2022
प्रेम अले पुढे म्हणाले की, नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी होऊ लागल्यास मी त्याला साहाय्य करीन. सध्या ५ पक्षांच्या आघाडी सरकारला दोन तृतीयांश बहुमत प्राप्त आहे. त्यामुळे सरकार नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी जनमत संग्रह करण्याचा प्रयत्न करू शकते. देशात बहुसंख्य लोकसंख्या हिंदु असल्याने जनमत संग्रहाच्या माध्यमातून नेपाळला आतापर्यंत हिंदु राष्ट्र घोषित करता आले असते.