महाविद्यालयांनी मराठीला प्राधान्य द्यावे ! – मुंबई विद्यापीठ
|
मुंबई – मुंबई विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या शासकीय अन् अशासकीय सर्व प्रकारच्या पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य द्यावे, यासाठी मुंबई विद्यापिठाने परिपत्रक काढले आहे. मुंबई विद्यापिठाशी संलग्न ८०० हून अधिक महाविद्यालयांना हे परिपत्रक पाठवण्यात आले आहे.
मुंबई विद्यापिठात मराठी भाषेचा वापर अधिकाधिक होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत, यासाठी जानेवारीमध्ये झालेल्या मुंबई विद्यापिठाच्या अधिसभेत शिवसेनेची शाखा असलेल्या युवा सेनेच्या सदस्या शीतल देवरूखकर शेठ यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबई विद्यापिठाने हे परिपत्रक काढले आहे. यामध्ये महाविद्यालयांचा नामफलक मराठी भाषेत असावा, तो दर्शनी भागात लावावा, महाविद्यालयाचे माहितीपुस्तक अन् प्रवेशअर्ज मराठी भाषेतही असावेत, पत्रव्यवहारात मराठी भाषेला प्राधान्य द्यावे, महाविद्यालयाच्या सूचना मराठीतून लिहिण्याला प्राधान्य द्यावे, कार्यशाळांमध्ये मराठी भाषेचा उपयोग करावा, २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरवदिन’ साजरा करावा, त्यानिमित्त विविध चर्चासत्रे आणि स्पर्धा यांचे आयोजन करावे, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मोहीम राबवावी, अशा सूचना दिल्या आहेत.