#Gudhipadva : गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !
गुढीवर तांब्याचा कलश उपडा घालतात. सध्या काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पेले किंवा मडक्याच्या आकाराची तत्सम भांडी गुढीवर ठेवत असल्याचे पहायला मिळते. ‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’, असे धर्मशास्त्र का सांगते, हे लक्षात येण्यासाठी त्यामागचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन येथे देत आहोत. यावरून आपल्या संस्कृतीचे अनन्यसाधारण महत्त्व आणि प्रत्येक कृती धर्मशास्त्रानुसार का करावी, हेही लक्षात येईल !
१. गुढीवर तांब्या उपडा का ठेवतात ?
तांब्याचे तोंड भूमीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुनिंबाची पाने आणि रेशमी वसन (गुढीवरील रेशमी वस्त्र) हे सात्त्विक लहरींनी भारीत होते. भूमीच्या आकर्षणशक्तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह भूमीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे भूमीवर सूक्ष्म-आच्छादन बनण्यास साहाय्य होते. तांब्याची दिशा सुलट ठेवली, तर संपूर्णतः ऊर्ध्व दिशेने लहरींचे प्रक्षेपण झाल्याने आणि भूमीलगतच्या कनिष्ठ आणि मध्यम स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील केवळ ठराविक अशा ऊर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होण्यास साहाय्य होते. याउलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा भूमीकडे ठेवल्याने त्यातून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींचा लाभ भूमीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, यासमवेतच ऊर्ध्वमंडलाला मिळण्यास साहाय्य होते. – एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या टोपण नावाने भाष्य करतात.) (१७.३.२००५)
२. तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण लहरींचे कडुनिंब आणि रेशमी वस्त्र यांच्याकडून प्रभावी ग्रहण आणि प्रक्षेपण होणे
तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण कार्यरत लहरींचे कडुनिंबाच्या पानांच्या स्तराला सगुण लहरींमध्ये रूपांतर होते. त्यानंतर या लहरी रेशमी वसनाच्या (गुढीवरील रेशमी वस्त्राच्या) माध्यमातून प्रभावीपणे ग्रहण केल्या जाऊन त्या आवश्यकतेप्रमाणे अधोदिशेकडे प्रक्षेपित केल्या जातात.
३. कडुनिंब, कलश आणि वस्त्र या तिघांमधून निर्माण होणाऱ्या लहरींनी वायूमंडल शुद्ध होणे
कडुनिंबाच्या पानांतून प्रक्षेपित होणाऱ्या शिव-शक्तीशी संबंधित कार्यरत रजोगुणी लहरींमुळे अष्टदिशांचे वायूमंडल, तसेच तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे ऊर्ध्व दिशेचे वायूमंडल आणि रेशमी वस्त्रातून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे अधोदिशेचे वायूमंडल शुद्ध अन् चैतन्यमय बनण्यास साहाय्य होते.
४. तांब्याचे तोंड भूमीच्या दिशेला असूनही ऊर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होणे !
गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीत घनीभूत झालेल्या नादलहरी कार्यरत होतात. या नादलहरींमध्ये वायू आणि आकाश ही उच्च तत्त्वे सामावलेली असल्याने तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींची गती ही उसळणाऱ्या कारंजाप्रमाणे अन् ऊर्ध्वगामी असल्याने या लहरींच्या प्रक्षेपणामुळे ऊर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होते.
#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |