घरावर भाजपचा ध्वज लावणार्या मुसलमान तरुणाला धर्मांधाकडून जिवे मारण्याची धमकी : गुन्हा नोंद !
|
कानपूर (उत्तरप्रदेश) – कुशीनगर येथील भाजपचा समर्थक बाबर अली याच्या हत्येची घटना ताजी असतांना कानपूरमधूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथील शकील अहमद नावाच्या एका सुशिक्षित मुसलमान युवकाने घरावर भाजपचा ध्वज लावल्याने त्याला त्याचे डोळे काढून मुंडके छाटण्याची धमकी त्याच्याच शेजारी असलेल्या शाहनवाझ याने दिली. एवढेच नव्हे, तर त्याला काही धर्मांधांनी मारहाणही केली. या प्रकरणी शकीलने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शाहनवाझ, राशिद, रिजवान आणि भल्लू यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
‘लोकसत्ता’ वृत्तसंकेतस्थळाने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार शकीलने सांगितले की, तो वर्ष २०१३ पासून भाजपचा समर्थक आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्याने त्याच्या घरावर भाजपचा ध्वज लावला होता, तर आजूबाजूच्या सर्वांनी काँग्रेसचे ध्वज लावले होते. याच कारणामुळे त्याचे शेजारी त्याच्यावर अप्रसन्न (नाराज) होते आणि सगळ्यांनी मिळून त्याच्या घरावरचा भाजपचा ध्वज काढून फेकून दिला. शकीलने पुन्हा ध्वज लावला. यामुळे त्याला धमकी देण्यात आली.