भ्रष्टाचार्यांना शिक्षा हवीच !
सध्या देशभरात विविध ठिकाणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सीबीआय आणि आयकर विभाग या अन्वेषण यंत्रणांद्वारे अवैध मार्गाने संपत्ती जमवल्याप्रकरणी अन् आर्थिक अपव्यवहाराच्या प्रकरणी आमदार, खासदार, तसेच मंत्री यांच्यावर कारवाई चालू आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड होत आहे, ही जमेची बाजू आहे. काही राज्यांतील गृहखात्यानेही विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाई करायला प्रारंभ केला. त्यामुळे विविध अन्वेषण यंत्रणांनी चालू केलेली कारवाई प्रत्येक भ्रष्टाचार्यापर्यंत पोचावी आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच यात राजकारण न होता अन् कुणालाच झुकते माप मिळायला नको, असे सर्वसामान्य जनतेला वाटते.
अन्वेषण यंत्रणांनी ज्या कुणावर धाड टाकून त्यांची अवैध संपत्ती कह्यात घेतली आहे, तर त्यांचे पुढे काय झाले ? अन्वेषण यंत्रणांना स्वतंत्रपणे कार्य करायला मर्यादा आहेत का ? असे असंख्य प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत असतात. गेल्या काही वर्षांपासून ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’सारख्या संस्थांना नि:पक्ष आणि स्वतंत्रपणे काम करायला मर्यादा येत होत्या, अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली होती. ही गोष्ट अतिशय गंभीर आणि देशासाठी चिंताजनक आहे. अन्वेषण यंत्रणांनी चालू केलेल्या या कारवाईमुळे हे चित्र पालटेल, असे जनतेला वाटत आहे. अन्वेषण यंत्रणांनी स्वतःची प्रतिमा चोख आणि पारदर्शक ठेवणे आवश्यक आहे. देशाला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटणारे राजकीय पक्ष, नेते, मंत्री, तसेच उद्योजक सर्वच जण कठोर शिक्षेस पात्र आहेत. आज गुन्हा करून अनेक जण उजळ माथ्याने फिरत आहेत. अशांचे गुन्हे उघड करून त्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणे, तसेच सोन्याचा धूर निघणार्या देशाची ‘भ्रष्टाचारी भारत’ ही प्रतिमा पुसण्याचे दायित्वही यंत्रणांचे आहे.
पूर्वीच्या काळी राजे तत्त्वनिष्ठ राहून गुन्हेगारांवर कारवाई करत होते. त्यामुळे राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण अल्प असे. आता गुन्हेगारांमध्येच कायद्याची भीती राहिलेली नाही. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी अन्वेषण यंत्रणांनी कंबर कसणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना कायद्याचे भय न वाटण्यामागील कारणांचा अभ्यास करून त्यामध्येही सुधारणा करायला हवी, असे जनतेला वाटते. ही सर्व प्रक्रिया तत्त्वनिष्ठपणे आणि प्रामाणिकपणे केली, तरच देशातील भ्रष्टाचार अन् गुन्हेगारी संपेल, हे नक्की !
– श्री. सचिन कौलकर, मुंबई.