आतंकवादी आणि पत्रकार !
येथे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये २९ मार्च या दिवशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. यांतील रईस अहमद भट हा पूर्वी पत्रकार म्हणून काम करायचा. तो अनंतनागमध्ये ‘व्हॅली न्यूज सर्व्हिस’ नावाने ऑनलाईन वृत्तसंकेतस्थळ चालवायचा. हे धक्कादायक आहे. काश्मीरमध्ये पोलिसांनी आतंकवादाची वाट धरल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. त्यामुळे ‘कुणी पोलीस आतंकवादी झाला’, असे ऐकल्यावर आश्चर्य वाटत नाही. आतंकवादी संघटनेत सहभागी होतांना हे पूर्वाश्रमीचे पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यातील शस्त्रास्त्रेही पळवून घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. पत्रकार आतंकवादी झाल्याचा प्रकार भारतात तरी दुर्मिळ आहे. भारतात बर्याचदा नक्षलवाद्यांच्या बाजूने लिहिणार्या किंवा वृत्ते प्रसारित करणार्या प्रसारमाध्यमांची संख्या मोठी आहे. हे पत्रकार उघडपणे पाठिंबा देतांना दिसतात. काही वृत्तपत्रांमध्ये तर काश्मीरमध्ये आतंकवादी पसरण्यास तेथील गरिबी आणि बेरोजगार यांना दोष देतांना दिसतात. असे अभ्यासशून्य वक्तव्य करणे, हेही एकप्रकारे आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ प्रसारित झाल्यानंतर अनेक जणांनी ‘काश्मिरी हिंदूंनी अन्याय आणि अत्याचार सहन केले; मात्र त्याचा सूड उगवण्यासाठी कधी हातात बंदूक घेतली नाही’, हे आपण लक्षात घ्यायला हवे. पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाकल्यावर ‘लेखणीत शक्ती असते’, असे सांगण्यात येते किंबहुना ते योग्यही आहे. विचारांमध्ये जग पालटायची क्षमता असते. भारतीय स्वातंत्र्याच्या काळात वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकजागृती करण्यात आली. स्वातंत्र्यासाठी पेटून उठण्यासाठीची प्रेरणा लोकांना ‘केसरी’सारख्या वृत्तपत्रांतून मिळाली. लेखणीचा समाजकल्याणासाठी वापर केल्याचा हा परिणाम होता. याउलट आताची स्थिती दिसून येत आहे. यांतील ‘रईस अहमद भट याला लेखणी सोडून बंदूक हातात घ्यावीशी का वाटली ?’, ‘तो कुठल्या विचारांनी प्रेरित झाला होता ?’ हे पुढे यायला हवे. आतापर्यंत डॉक्टर, अभियंता आदी उच्चशिक्षित धर्मांध यांनी जिहादचा मार्ग अवलंबला. आता या मार्गाने जाणार्यांमध्ये पत्रकारांचीही भर पडली आहे. असे जिहादी विचार असणार्या पत्रकाराने वृत्तसंकलित केलेली प्रत्येक बातमी किंवा लेख यांचीही पडताळणी व्हायला हवी; कारण लेखणीच्या माध्यमातून केलेली गरळओक लोकांची माथी भडकावण्यासाठी पुरेशी असते. पत्रकारिता क्षेत्राला लागलेली ही कीड घातक आहे. याविषयी चर्चा का नाही ? पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत संस्थांनी याविषयी अवश्य भाष्य करावे. हिंदूंविरुद्ध चालू असलेल्या जिहादी कारवाया दडपणे, हिंदू पीडित असतांना त्यांना ‘पीडा देणारे’ म्हणून दाखवणारे, हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधणारे ‘कलम’वीर हे वैचारिक आतंकवादीच होय. जिहादी आतंकवादापेक्षा हा आतंकवाद अधिक भयानक आहे. अशांचा जोरकसपणे वैचारिक प्रतिवाद करणे, ही काळाची आवश्यकता आहे.