युगादीनंतरच्या ‘होसतोडकू’ (कर्नाटकातील सण) या दिवशी सरकारने झटका मांस उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी !

कर्नाटकातील समस्त हिंदू संघटनांच्या संघाची मागणी !

हिंदूंनी हलाल मांसावर बहिष्कार घालण्याचेही आवाहन !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी हिंदूंवर येऊ नये. सरकारने स्वतःहून ही व्यवस्था करणे आवश्यक ! – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदूंनी गुढीपाडव्याच्या दुसर्‍या दिवशी येणार्‍या ‘होसतोडकू’ या सणाच्या वेळी हलाल मांसाच्या ऐवजी झटका मांसाचा उपयोग करावा. हलाल मांसाच्या माध्यमातून त्यांनी आधीच अल्लाला अर्पण केलेले म्हणजे उष्टे केलेले मांस पुन्हा हिंदूंच्या देवाला अर्पण करणे, हे हिंदु धर्माच्या विरुद्ध आहे. त्यासाठी शासनाने हिंदूंचा धार्मिक हक्क लक्षात घेऊन राज्यात सर्वत्र ‘झटका’ मांस मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी कर्नाटकातील समस्त हिंदु संघटनांच्या संघाने येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

हलाल प्रमाणपत्रावर बंदी घाला !

या संघाकडून पुढे सांगण्यात आले की, आज राज्यात हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याविषयी आग्रह होत असल्याचे ऐकू येत आहे. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला समांतर अशी स्वतंत्र इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे कारस्थान इस्लामी संघटना करत आहेत. हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. देशात आहार उत्पादनांविषयी प्रमाणपत्र देण्यास एफ्.एस्. एस्.ए.आय. (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) आणि एफ्.डी.ए. (फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन – अन्न आणि औषध प्रशासन) यांसारख्या अधिकृत सरकारी संस्था असतांना पैसे घेऊन इस्लामी पद्धतीचे प्रमाणपत्र देणे हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे आणि देशाच्या बहुसंख्यांक उद्योजकांवर, वंशपरंपरेने मांसाचा व्यापार करणार्‍या हिंदु खाटिक समुदायावर केलेला अन्याय आहे. त्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करणार्‍या राज्यघटनेच्या कलम ४६चे उल्लंघन आहे. त्यासाठी हलाल प्रमाणपत्रावर तत्परतेने प्रतिबंध घालण्यात यावा.

हलाल आणि झटका मांस यांतील भेद !

हलाल मांस म्हणजे प्राण्यांचे तोंड मक्केच्या दिशेला करून त्यांच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्यांना तडफडत मरू दिले जाते. त्यात प्राण्यांचे रक्त मोठ्या प्रमाणात वहाते. याउलट हिंदु किंवा शीख धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्यांची हत्या केली जाते. त्यात प्राण्यांची मान एकाच घावात कापली जात असल्याने त्यांना अल्प प्रमाणात त्रास होतो.

या पत्रकार परिषदेला खालील विविध हिंदु संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

१. श्री. मोहन गौडा, राज्य प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
२. श्री. मुनी गौडा, संस्थापक, हिंदवी झटका मीट, बेंगळुरू.
३. श्री. गोपालकृष्ण, प्रांत प्रमुख, बेंगळुरू उत्तरभाग, हिंदू जागरण वेदिके
४. श्री. रामू, विश्‍व हिंदु परिषद, बेंगळुरू.
५. श्री. सुरेश जैन, अध्यक्ष, अखिल भारत हिंदू महासभा
६. श्री. एस्. भास्करन्, अध्यक्ष, विश्‍व सनातन परिषत्, बेंगळुरू.
७. सौ. शुभा बी. नायक, अधिवक्ता, बेंगळुरू उच्च न्यायालय.