पाकमध्ये चिनी कामगार करत आहेत ख्रिस्ती आणि मुसलमान तरुणींची तस्करी

चिनी कामगार पाकमधील तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात, त्यांच्याशी विवाह करतात आणि त्यांना चीनमध्ये नेतात

इस्लामाबाद (पाकिस्तान) – चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाचे काम चालू आहे. या महामार्गावर चीनकडून विविध प्रकल्प राबवले जात आहेत. यासाठी गेल्या काही वर्षांपासून चिनी कामगार पाकमध्ये आलेले आहेत. याच काळात पाकमधील अनेक तरुणी, विशेषतः ख्रिस्ती तरुणी यांची तस्करी करून त्यांना चीनमध्ये पाठवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. येथे आलेला चिनी कामगार पाकमधील तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात, त्यांच्याशी विवाह करतात आणि त्यांना चीनमध्ये नेतात. या वेळी अडीच ते ४ लाख रुपयांपर्यंत पैसेही खर्च करतात.

१. नुकतेच पाकने त्याच्या देशातील मुसलमान तरुणींना मुसलमानेतर पुरुषांशी विवाह करण्यास शरीयत कायद्याद्वारे बंदी घातली आहे. यामुळे चिनी कामगारांना मुसलमान तरुणींशी विवाह करण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ते ख्रिस्ती तरुणींना लक्ष्य करत आहेत. पंजाबच्या गुजरांवाला येथून प्रतिवर्ष ७५० ते १ सहस्र ख्रिस्ती तरुणींना चिनी कामगार खरेदी करून चीनमध्ये घेऊन गेले आहेत. या तरुणींना चिनी संस्कृती, भाषा आदींचे ज्ञान नसते. चीनमध्ये गेल्यावर त्यांच्यावर अत्याचार केले जातात. तसेच त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. काही तरुणींची तर हत्या करून त्यांचे अवयव काढून ते विकलेही जातात, असे सांगितले जात आहे.

२. चीनमध्ये एकच मूल जन्माला घालण्याच्या आतापर्यंतच्या धोरणामुळे चीनमध्ये तरुणींची कमतरता आहे. येथे मुलींना गर्भातच मारले जात असल्याने मुलींची संख्या अल्प झाली आहे. त्यामुळे चिनी तरुणांना मुली मिळणे कठीण होऊ लागले आहे.

३. पाकमध्ये पाकिस्तानी पोलीस एरव्ही मानव तस्करी करणार्‍यांवर कारवाई करते; मात्र चिनी कामगारांवर कारवाई करण्यास धजावत नाही. याला पाक सरकारचे चीनशी असलेले चांगले संबंध कारण असल्याचे सांगितले जात आहे.