२ वर्षांच्या कालावधीत सांगली विधानसभा क्षेत्रात विकासकामांचा डोंगर ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

पत्रकार परिषदेत माहिती देतांना आमदार श्री. सुधीर गाडगीळ (मध्यभागी) आणि अन्य

सांगली, ३१ मार्च (वार्ता.) – आमदार स्थानिक विकास निधी यांच्या माध्यमातून, तसेच अन्य निधी यांतून ९ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीतून रस्ते, सामाजिक सभागृह, रस्त्यावरील पथदिवे यांची उभारणी केली. स्थानिक विकास निधी कोरोना काळात योग्य ठिकाणी वापरून कायमस्वरूपी ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन’, ‘ऑक्सिजन व्हेंटिलेटर’ यांसह २ वर्षांच्या कालावधीत सांगली विधानसभा क्षेत्रात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, अशी माहिती भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी भाजप संघटन सरचिटणीस दीपक माने, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने, महिला मोर्चा अध्यक्षा अधिवक्ता स्वाती शिंदे, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील यांसह अन्य उपस्थित होते.

१. सांगली जिल्ह्यात हुतात्मा स्मारक नसल्यामुळे माजी सैनिकांच्या मागणीनुसार त्रिकोणी बागेत हुतात्मा स्मारक उभारले आहे. थोड्याच दिवसांत त्याचे लोकार्पण होईल. कोरोना काळात पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आणि महापालिका यांना रुग्णवाहिकेसाठी १७ लाख रुपये उपलब्ध करून दिले. त्याचसमवेत शासकीय रुग्णालयात हवेतून प्राणवायू सिद्ध करण्यासाठी ‘प्लांट’ बसवण्यासाठी ९० लाख रुपयांचा निधी आमदार स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून दिला.

२. २५-१५ ग्रामीण विकास योजनेच्या अंतर्गत हरिपूर, इनामधामणी, अंकली, बामणोली या गावातील रस्ते विकास कामासाठी १ कोटी इतका निधी संमत करून घेतला. ‘जलजीवन मिशन’ योजनेमधून मौजे इनामधामनी, जुनी धामणी, पद्माळे या गावांना पाणीपुरवठ्यासाठी पाण्याच्या टाकी, अंतर्गत पाणी पुरवठा करणे, ‘जॅकवेल’ ते पाणी शुद्धीकरण केंद्रापर्यंत पाण्याची वाहिनी करणे यांसाठी निधीची मागणी केली आहे. त्यातील मौजे इनामधामणीसाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी संमत झाला आहे.

३. सांगली शासकीय रुग्णालयाच्या खुल्या भूमीत १०० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठी ४५ कोटी ४० लाख, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माता आणि बालसंगोपन यासाठीच्या १०० खाटांच्या रुग्णालयासाठी ३२ कोटी ४५ लाख संमत केले आहेत.