हिंदूंनो, काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी वेळीच सावध व्हा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
मुणगे (तालुका देवगड) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा
देवगड – काश्मीरमध्ये हिंदु पंडितांवर अनन्वित अत्याचार झाले. वेळीच सावध न झाल्याने काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला. सिंधुदुर्गातही ‘लव्ह जिहाद’चे प्रकार घडत आहेत. आपण वेळीच सावध होऊन संघटित झाले पाहिजे, म्हणजे काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येणार नाही, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी तालुक्यातील मुणगे येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.
मुणगे येथील श्री भगवती मंदिराच्या सभागृहामध्ये ही सभा झाली. सभेच्या प्रारंभी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, तर श्री. खाडये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
या वेळी श्री. खाडये पुढे म्हणाले, ‘‘मंदिरांचे सरकारीकरण करण्याच्या नावाखाली आपल्या प्रमुख मंदिरांसह शेकडो मंदिरे शासनाने अधिग्रहित केलेली आहेत. या मंदिरात जमा होणारा निधी अक्षरशः लुटला जात आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या शेकडो एकर भूमीचा अपहार करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीने याच्या विरोधात लढा दिल्यामुळे त्यातील काही प्रमाणात भूमी पुन्हा मिळवण्यात यश आले आहे. लवकरच उर्वरित भूमीही मंदिराला पुन्हा मिळवून देण्यात येईल. या अनाचाराच्या विरोधात लढा देणे हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे. हा लढा देण्यास सक्षम होण्यासाठी हिंदु बांधवांनी धर्माचरण करणे आवश्यक आहे. असे केल्यास ईश्वराचे पाठबळ आपल्याला मिळेल.’’
सभा यशस्वी होण्यास सहकार्य करणार्यांचे हिंदु जनजागृती समितीने मानले आभार !
१. श्री देवी भगवती देवस्थान विश्वस्त मंडळाने सभेसाठी सभागृह उपलब्ध करून दिले.
२. श्री. आबा पुजारी आणि श्री. नाना बागवे यांनी सभेसाठी येणार्या धर्माभिमानी हिंदूंसाठी वाहन उपलब्ध करून दिले.
३. सभेच्या प्रसारासाठी वाडीवर बैठक घेण्यासाठी मुणगे गावच्या सरपंच सौ. साक्षी प्रभु, पोलीस पाटील सौ. साक्षी सावंत, सौ. दुर्गा परब यांच्यासह सर्वश्री बाळकृष्ण परब, धर्माजी आडकर, अजित रासम, संजय घाडी, अनिल धुवाळी, दादा वळंजू, सुधीर पाडावे आणि दिगंबर पेडणेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
अभिप्राय
१. दक्षता दशरथ मुणगेकर – गावात सभा आयोजित करून सर्व ग्रामस्थांमध्ये हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या चळवळीचा प्रारंभ करून दिला आहे. आजचा दिवस खरच हिंदूंसाठी लाखमोलाचा आहे.
२. श्री. नीलम नीलेश सावंत – हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा या सभेच्या माध्यमातून निर्माण झाली.
३. श्री. विश्वास शंकर मुणगेकर – हिंदु धर्माचा प्रसार होण्यासाठी अशाप्रकारे सभा घेणे आवश्यक आहे. त्यातून प्रबोधन होऊन हिंदू संघटित होण्यास साहाय्य होईल.
४. साक्षी जयराम घाडी – हिंदु जनजागृती समितीच्या सभा वर्षातून न्यूनतम २ वेळा होणे आवश्यक आहे. नवीन पिढी भरकटत आहे. नको ते विचार आणि संस्कार आचरणात आणत आहे. त्यासाठी अशा सभांची आवश्यकता आहे.
५. श्री. प्रसाद परब – सन्माननीय वक्त्यांनी ‘सध्याची समाजापुढील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ यांविषयी महत्त्वाची माहिती दिली.
क्षणचित्रे
१. सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान मुणगे येथील देवी भगवती एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक श्री. देवदत्त (आबा) पुजारे यांनी केला.
२. श्री. मनोज खाडये यांचा सत्कार श्री देवी भगवती देवस्थान समितीचे उपाध्यक्ष श्री. दिलीप महाजन यांनी केला.