कारागृहातील बंदीवानांना ५० सहस्रांपर्यंत कर्ज मिळणार !
शासनाचा निर्णय !
मुंबई – कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या बंदीवानांना राज्य शासनाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुण्याच्या येरवडा कारागृहात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून बंदीवानांना ५० सहस्र रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. कारागृहातील कामांसाठी मिळणाऱ्या बंदीवेतनाच्या आधारावर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक बंदीवानांना कर्जपुरवठा करणार आहे. त्यानुसार बंदीवानांना ७ टक्के इतक्या माफक दराने कर्ज दिले जाईल. मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अशा प्रकारच्या योजनेची कार्यवाही करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरणार आहे. ही योजना यशस्वी ठरल्यास राज्यभरातील कारागृहात तिची कार्यवाही होईल. तसे घडल्यास कारागृहात बंदीवान आपल्या कुटुंबाची आर्थिक आवश्यकता, मुलांचे शिक्षण किंवा विवाह यांसाठी कर्ज घेऊ शकतील. कारागृहातील कामांसाठी मिळणाऱ्या मोबदल्याच्या आधारे कर्ज देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल. राज्यातील १ सहस्र ५५ बंदीवानांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.