केरळमध्ये स्वतःचा कोणताच धर्म नसल्याचे लिहून दिल्यामुळे जन्मतः मुसलमान नृत्यांगनेला मंदिरात भरतनाट्यम् नृत्य सादर करण्यास नकार !
राज्यातील कूडलमणिक्यम् मंदिरात पूजा करण्यासाठी किंवा कार्यक्रम सादर करण्यासाठी हिंदु असणे अपरिहार्य !
|
कोच्ची – केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात असलेल्या इरिंजलकुडा येथील कूडलमणिक्यम् मंदिरात भरतनाट्यम् नृत्यांगना मानसिया व्ही.पी. यांना मंदिरातील एका कार्यक्रमात त्या हिंदू नसल्याचे कारण देत वगळण्यात आले. मानसिया यांनी भरतनाट्यम्मध्ये पी.एच्.डी केले आहे.
मानसिया या जन्माने मुसलमान आहेत. त्यांनी भरतनाट्यम् शिकल्यामुळे त्यांना त्यांच्या समाजातील इस्लामी धर्मगुरूंच्या संतापाचा आणि बहिष्काराचा सामना करावा लागला होता. एका वृत्तपत्राने कूडलमणिक्यम् देवस्वोम मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मेनन यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मंदिराच्या विद्यमान परंपरेनुसार मंदिराच्या आवारात केवळ हिंदूच पूजा करू शकतात. मंदिर व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या महोत्सवात अनुमाने ८०० कलाकार विविध कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करणार आहेत. आमच्या नियमांनुसार कलाकारांना ते हिंदू आहेत कि नाही, हे विचारले जाते. मानसिया यांनी त्यांचा कोणताही धर्म नसल्याचे लेखी दिले होते. त्यामुळे त्यांना कार्यक्रमाची अनुमती नाकारण्यात आली. आम्ही मंदिरात परंपरेनुसार त्यांना नकार कळवला आहे.’
विहिंपने पवकुक्लम् मंदिरात दिले निमंत्रण !नृत्यांगना मानसिया यांना पवकुक्लम् मंदिरात नृत्य सादर करण्यासाठी निमंत्रित केले आहे. ‘हा कार्यक्रम कधी सादर होईल, याचा दिनांक आणि वेळ नंतर कळवण्यात येईल’, असे विहिंपने कळवले आहे. |