इस्रायलमध्ये आतंकवादी आक्रमणात ५ जण ठार
तेल अवीव (इस्रायल) – येथे २९ मार्चच्या सायंकाळी आतंकवाद्याने केलेल्या गोळीबारात ५ जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. पोलिसांनी या आतंकवाद्याला गोळ्या घालून ठार मारले. त्याचे नाव हमरशेहा (वय २६ वर्षे) असे असून तो पॅलेस्टाईनचा नागरिक आहे. तो इस्रायलमध्ये अवैधरित्या रहात होता. वर्ष २०१३ मध्ये त्याला सुरक्षेच्या संदर्भातील गुन्ह्याच्या प्रकरणात अटकही करण्यात आली होती. त्या वेळी त्याला ६ मासांच्या कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली होती. तेल अवीव येथील हे आक्रमण गेल्या ७ दिवसांत आतंकवाद्यांनी इस्रायलमध्ये केलेले तिसरे आक्रमण होय. यात आतापर्यंत ११ जण ठार झाले आहेत.