आनंदी, प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असणारे सनातनचे ६५ वे संत पू. (कै.) जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा (वय १०० वर्षे) यांच्या देहत्यागापूर्वी अन् देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे
आज फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी (३१ मार्च २०२२) या दिवशी पू. जनार्दन वागळेआजोबा यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस असल्याच्या निमित्ताने…
पू. वागळेआजोबांच्या देहत्यागानंतर ‘त्यांना न्यायला जणू विमान आले आहे’, असे सूक्ष्मातून जाणवून परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प फलद्रूप झाल्याची आलेली अनुभूती१. परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. आजोबांना ‘तुम्हाला न्यायला विमान येईल’, असे सांगून चिंतामुक्त करणे : ‘पू. आजोबांच्या मनात ‘आपण जर आजारी पडून अंथरुणावर खिळून राहिलो, तर आपले कसे होणार ?’, असा विचार असायचा. ‘एवढा मोठा देह आहे (पू. आजोबांचे वजन ८५ किलो होते.), या देहाला आणि इतरांना त्रास व्हायला नको’, असे त्यांना वाटायचे. वर्ष २०२० मध्ये त्यांनी याविषयी एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले होते. तेव्हा परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘आजोबा, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला न्यायला विमान येईल !’’ – श्री. पुरुषोत्तम वागळे २. पू. आजोबांच्या अंत्ययात्रेच्या वेळी ‘पू. आजोबांना न्यायला जणू विमान आले आहे’, असे सूक्ष्मातून जाणवणे : ‘पू. आजोबांनी १९ मार्चला देहत्याग केला. २० मार्चला, म्हणजे तुकारामबिजेच्या दिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमनाची आम्हाला आठवण आली. मी पूर्वी संत तुकाराम महाराज यांच्यावरील एक चित्रपट पाहिला होता. त्यात दाखवल्याप्रमाणे ‘पू. आजोबांना न्यायला जणू विमान आले आहे’, असे मला सूक्ष्मातून जाणवत होते. त्या वेळी वातावरणही पुष्कळ प्रसन्न होते. यातून ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प कसा फलद्रूप होतो’, याची मला अनुभूती आली.’ – सौ. संगीता लोटलीकर |
१. श्री. विजय लोटलीकर (वय ७० वर्षे) आणि सौ. संगीता लोटलीकर (वय ६२ वर्षे) (पू. वागळेआजोबांचे जावई आणि मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
१ अ. पू. वागळेआजोबांनी त्यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त घेतलेला नवीन पोशाख आनंदाने घालणे : ‘१८.१.२०२२ या दिवशी पू. आजोबांचा शंभरावा वाढदिवस झाला. या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी त्यांच्यासाठी घेतलेला नवीन पोशाख घालून पाहिला. त्यांना तो आवडला आणि त्यांनी आनंद व्यक्त केला. दिवसभर त्यांनी तो पोशाख घातला होता. या वयातही ते दिवसभर उत्साही आणि आनंदी होते.
१ आ. ‘रुग्णाईत असलेले पू. वागळेआजोबा अनुसंधानात आहेत’, असे वाटून ‘ही त्यांची शेवटची भेट आहे’, असा विचार मनात येणे : २३.२.२०२२ या दिवशी पू. वागळेआजोबा फिरायला गेले असतांना पडले. त्यांच्या कंबरेजवळील हाडाचा अस्थीभंग (फ्रॅक्चर) झाला. वयोमानानुसार त्यांचे शस्त्रकर्म करता येणार नव्हते. आम्ही त्यांना भेटायला गेलोे. त्या वेळी त्यांचा कफाचा त्रासही वाढला होता. ‘ते अनुसंधानात आहेत’, असे वाटले आणि त्यांचा तोंडवळाही चैतन्यदायी दिसत होता. त्यांच्या या स्थितीवरून ‘ही त्यांची शेवटची भेट आहे’, असे आम्हाला वाटले.
१ इ. देहत्याग : १९.३.२०२२ या दिवशी पू. वागळेआजोबा यांनी देहत्याग केला. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा ‘निर्विचार’ हा नामजप चालू होता.
१. ‘देहत्यागानंतर जणू ते शांत झोपले असून त्यांच्या देहाची अंतर्गत हालचाल चालू आहे’, असे वाटत होते.
२. त्यांचा देह चैतन्यमय वाटत होता आणि घरातही चैतन्य जाणवत होते. त्या वेळी आम्हाला प्रार्थना आणि नामजप करण्याची आठवण होत होती.
३. त्यांचा देह जेथे ठेवला होता, तेथे एक श्वान येऊन बसला होता. पू. आजोबांना स्मशानात घेऊन जातांना तोही त्यांच्या समवेत स्मशानापर्यंत गेला. त्यांचे अंत्यविधी होईपर्यंत चार-पाच श्वान स्मशानात बसून होते.
४. पू. आजोबांच्या अंत्ययात्रेला २०० लोक आले होते. अंत्यविधीसाठी स्मशानात आलेल्या बहुतांश व्यक्ती साधना न करणाऱ्या होत्या. त्या म्हणत होत्या, ‘‘तुमच्या घरात आनंद जाणवत होता. ‘सनातन संस्थेने जे शिकवले, ते कृतीत कसे आणायचे ?’, हे आम्हाला शिकायला मिळाले.’’
५. अंत्यविधी झाल्यावर आम्ही पू. आजोबांच्या खोलीत गेलो. त्या वेळी ‘तेथे त्यांचे अस्तित्व आहे’, असे वाटत होते अन् चैतन्य जाणवत होते.’
२. श्री. पुरुषोत्तम वागळे (वय ६७ वर्षे) (पू. आजोबांचा पुतण्या), रत्नागिरी
२ अ. प्रेमभाव : ‘पू. आजोबांचा स्वभाव प्रेमळ होता. ते सर्वांना प्रेमाने हाक मारत आणि प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत.
२ आ. पू. आजोबांनी रुग्णालयात तल्लीन होऊन भजन म्हणतांना त्यांची भावावस्था पहाता येणे : पू. आजोबांना उपचारांकरता रुग्णालयामध्ये भरती केले असता स्वतःला होणाऱ्या वेदना विसरून त्यांनी श्रीकृष्णाचे एक भजन म्हणून दाखवले होते. भजन म्हणत असतांना ते इतके तल्लीन झाले होते की, त्यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ भाव दिसत होता. त्यानंतर त्यांचा तोंडवळा एकदम प्रसन्न दिसू लागला. मला पू. आजोबांची उत्कट भावावस्था पहाता आली.
२ इ. पू. आजोबांनी देह ठेवण्यापूर्वी झालेली त्यांची भेट ! : पू. आजोबांनी देह ठेवण्यापूर्वी सकाळी मी त्यांना पहाण्यासाठी देवीहसोळ येथे गेलो होतो. मी त्यांना परात्पर गुरु डाक्टरांचे छायाचित्र दाखवले. त्या वेळी त्यांच्या तोंडवळ्यावर हास्य उमटले आणि त्यांनी गुरुदेवांना नमस्कार केला. तेव्हा त्यांचा तोंडवळा प्रसन्न दिसत होता. ते काहीतरी सांगत होते; परंतु त्यांचे बोलणे समजत नव्हते. त्यानंतर दीड घंट्याने त्यांनी देह ठेवला. ‘त्या वेळी ते अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले.
२ ई. पू. आजोबांच्या देहत्यागानंतर घरात चैतन्य जाणवून मन स्थिर रहाणे : ‘पू. आजोबांनी देहत्याग केल्यानंतर त्यांचा देह चैतन्यमय दिसत होता. ‘ते गेले आहेत’, असे वाटतच नव्हते. घरातील वातावरणही प्रसन्न होते आणि घरात चैतन्य जाणवत होते. एरव्ही एखाद्याच्या मृत्यूनंतर मन अस्थिर होते आणि वाईट वाटते; पण पू. आजोबांच्या देहत्यागानंतर माझे मन स्थिर होते. मला प.पू. भक्तराज महाराज यांची आठवण येऊन कृतज्ञता वाटत होती.
२ उ. अंत्यविधीच्या वेळीही स्मशानात चैतन्य जाणवत होते. पू. आजोबांचा तोंडवळा प्रसन्न होता आणि ‘ते शांत झोपले आहेत’, असे जाणवत होते.
२ ऊ. पू. आजोबांची रक्षा (विभूती) गोळा करत असतांना आणि ती विसर्जित करतांना आलेल्या अनुभूती
१. आम्ही २३.३.२०२२ या दिवशी स्मशानात जाऊन रक्षा (विभूती) गोळा करत होतो. त्या वेळी विभूती एकदम पांढरी दिसत होती. ‘त्या विभूतीतून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
२. विभूती गोळा करतांना आणि ती विसर्जित करतांना ‘मला स्वतःला आध्यात्मिक लाभ होत आहे’, असे जाणवले.’
३. सौ. पुष्पलता पुरुषोत्तम वागळे (वय ६६ वर्षे), (आजोबांची चुलत सून, पुतण्याची पत्नी), रत्नागिरी
३ अ. पू. आजोबांनी इतरांचे कौतुक करणे : पू. आजोबांचा स्वभाव मुळातच प्रेमळ होता. त्यांना एखादा पदार्थ आवडला, तर ‘ते हातवारे करून ‘झक्कास !, असे म्हणून कौतुक करत आणि आवडीने खात असत.
३ आ. त्यांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत चांगली होती.
३ इ. सहनशीलता : पू. आजोबांच्या कंबरेच्या हाडाचा अस्थीभंग झाला होता; पण त्यांनी कधीही ‘वेदना सहन होत नाहीत’; म्हणून आरडाओरड केली नाही. ते सर्व वेदना सहन करत आणि सतत नामस्मरण करत असत. यावरून ‘साधना केल्याने अंगी सहनशीलता येते’, हे लक्षात आले.
३ ई. परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा : कुणी परात्पर गुरु डॉक्टरांचे नाव घेतले, तर पू. आजोबा आनंदाने लगेच नमस्कार करत असत. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत गुरुदेवांच्या अनुसंधानात राहून देहत्याग केला.’
|