दादर (मुंबई) येथील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांनी सादर केलेले नृत्य पहातांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे
दादर (मुंबई) येथील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ४.१.२०२२ आणि ५.१.२०२२ या दिवशी कथ्थक नृत्यातील अनेक प्रकार सादर केले. ‘या नृत्यप्रकारांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणाऱ्या आणि त्रास नसणाऱ्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करण्यात आला. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या संगीताचा अभ्यास करणाऱ्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सोनियाताईंनी सादर केलेले विविध नृत्यप्रकार पाहून साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१ अ. नृत्याच्या आरंभी : ‘नृत्य चालू करण्यापूर्वी सौ. सोनियाताईंनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करण्यासाठी त्यांच्या नावाचा उल्लेख केला. तेव्हा आमची पुष्कळ भावजागृती झाली. सोनियाताईंची सर्व नृत्ये बघतांना आमची भावजागृती होत होती.’
– श्री. गिरिजय प्रभुदेसाई, संगीत विशारद (तबला) आणि कु. रेणुका कुलकर्णी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.२.२०२२)
१ आ. खंडित नायिका (टीप १) आणि राधिका नायिका : नाट्यशास्त्रानुसार नायिकांचे गुणधर्मानुसार ८ प्रमुख प्रकार आहेत. त्यांपैकी सोनियाताईंनी खंडिता आणि राधिका नायिका (राधा-कृष्ण लीला) प्रस्तुत केली.
टीप १ – पतीची परस्त्रीविषयी असलेली आसक्ती, हे जिच्या दुःखाचे कारण आहे, ती ‘खंडित नायिका (खंडिता)’ होय.
१. ‘खंडित नायिका’ पहात असतांना माझी भावजागृती झाली. या नृत्यामध्ये ताईंनी केलेला प्रत्येक हावभाव माझ्या मनाला भावत होता. ‘ज्या भावना त्या अनुभवत होत्या, त्या माझ्या मनालाही अनुभवता येत आहेत’, असे मला जाणवले. ‘खंडित नायिका’ सादर झाल्यानंतर माझ्या तोंडवळ्यावर एक दैवी कण आला होता.’
– कु. मयुरी आगावणे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.२.२०२२)
२. ‘खंडित नायिका’ आणि ‘राधिका नायिका’ सादर करत असतांना सोनियाताई त्या भूमिकेशी पूर्णपणे एकरूप झाल्या होत्या. त्यामुळे ते नृत्य पहातांना मला पुष्कळ चांगले वाटत होते. खंडित नायिका पहातांना माझ्या डोळ्यांसमोर ‘खंडित नायिका’ येत होती, तर ‘राधिका नायिका’ पहातांना माझ्या डोळ्यांसमोर श्रीकृष्ण, राधा, तसेच गोपी येत होत्या. त्यामुळे ते नृत्य बघतांना मला आनंद जाणवला.’
– सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी (४.२.२०२२)
१ इ. पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील ‘जय जय राम कृष्ण हरि ।’ या नामाच्या गजरावर सादर केलेले नृत्य : यात सोनियाताईंनी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनातील प्रसंग साकारले.
१. ‘हे नृत्य पाहून ‘त्या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीराम, हनुमान आणि श्रीकृष्ण यांचे अस्तित्व आहे’, असे मला जाणवले आणि माझी भावजागृती झाली.’
– श्री. गिरिजय प्रभुदेसाई (११.२.२०२२)
२. ‘या वेळी ‘सोनियाताई देवाचे स्मरण करत आहेत आणि त्या नृत्याशी एकरूप झाल्या आहेत’, असे मला जाणवले.
३. सोनियाताईंचे नृत्य बघून ‘त्यांची नृत्यसाधना पुष्कळ तीव्र आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्या नृत्य करत असतांना कथानकातील भूमिकांशी समरस होतात. ‘त्यांच्या तोंडवळ्यावरही त्या भूमिकेला साजेसे भाव आपोआप येतात’, असे माझ्या लक्षात आले.’
– सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी (४.२.२०२२)
१ ई. तत्कार (टीप २)
टीप २ – पावलांचे विशिष्ट प्रकारे संचलन करून पायांच्या आघाताद्वारे जे बोल प्रकट केले (काढले) जातात, त्यांना ‘तत्कार’, असे म्हणतात.
१. ‘तत्काराचे बोल ऐकतांना मला शक्ती जाणवत होती. ते नृत्य पहातांना ‘माझ्या सहस्रारचक्रावर आघात होत आहेत’, असे मला जाणवले. ‘तत्कारांच्या माध्यमातून पाताळाच्या दिशेने शक्ती प्रक्षेपित झाल्याने वाईट शक्तींशी युद्ध चालू आहे’, असे मला जाणवले.’
– कु. रेणुका कुलकर्णी (४.२.२०२२)
२. ‘सोनियाताई सलग १ घंटा ‘तत्कार’ करत होत्या. त्यावरून ‘त्यांची नृत्य करण्याची क्षमता पुष्कळ आहे’, असे माझ्या लक्षात आहे. (‘त्या प्रतिदिन नियमित ८ घंटे नृत्याचा सराव करतात’, असे मला नंतर समजले.)
३. सोनियाताई नृत्य करत असतांना माझे लक्ष त्यांच्या पायांकडे गेले. ‘त्यांच्या पायांकडे पाहून ते (पाय) नृत्य करतांना बोलत आहेत. ते नृत्याशी एकरूप झाले आहेत’, असे मला जाणवले.’
– सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी (४.२.२०२२)
१ उ. गत (टीप ३)
टीप ३ – कथ्थक नृत्याचे अविभाज्य अंग मानल्या जाणाऱ्या ‘गत’ या प्रकारामध्ये ढंगदारपणे चालत एखादी विशिष्ट मुद्रा अथवा एखादा नायक अथवा नायिका यांची विशिष्ट अवस्था प्रस्तुत केली जाते, उदा. श्रीकृष्णाची बासरी घेण्याची पद्धत, राधेची घागर अथवा घुंगट घेण्याची पद्धत इत्यादी
१. ‘सोनियाताईंनी ‘सीता गत’, ‘मयूर गत’ आणि ‘नाग गत’ सादर केली. त्या ‘मयूर गत’ करत असतांना ‘प्रत्यक्ष मोरच नृत्य करत आहे’, असे मला वाटत होते.’
– श्री. गिरिजय प्रभुदेसाई (११.२.२०२२)
२. ‘मयूर गत’मध्ये त्यांनी पिसारा फुलवणारा आणि नाचणारा मोर दाखवला. त्या वेळी त्यांचे हावभावही मोरासारखेच होते. ते बघत असतांना माझ्या मनाला पुष्कळ आनंद जाणवत होता. मला माझ्या डोळ्यांसमोर मोर दिसत होता, तसेच ‘नाग गत’ करतांना त्यांचे हावभाव नागाप्रमाणे होते.’
– सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी (४.२.२०२२)
१ ऊ. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या ‘सुंदर ते ध्यान…’ या अभंगावर सादर केलेले नृत्य
१. ‘नृत्य बघत असतांना माझा भाव जागृत झाला.’
– कु. मयुरी आगावणे (८.१.२०२२)
२. ‘हे नृत्य करत असतांना त्या स्वतः संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेत गेल्या होत्या. त्या वेळी त्यांची भावजागृती होत होती आणि ते पाहून माझीही भावजागृती होत होती.
३. ‘नृत्याचा आध्यात्मिक स्तरावर माझ्यावर काय परिणाम होत आहे ?’, याचे निरीक्षण करत असतांना मला आध्यात्मिक त्रासामुळे माझ्या कोणत्या चक्रांवर संवेदना जाणवत आहेत किंवा कोणते तत्त्व जाणवत आहे ? हे कळत नव्हते; पण सर्व नृत्यप्रकार बघतांना माझ्या मनाला आनंदही मिळत होता.’
– सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी (४.२.२०२२)
२. सौ. सोनिया परचुरे यांना तबल्यावर साथ करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांना आलेल्या अनुभूती अन् त्यांना सौ. सोनियाताईंकडून शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांना आलेल्या अनुभूती
१. ‘साथसंगत करतांना मला पुष्कळ आनंद जाणवत होता. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते.
२. ‘तबल्याचा नाद आणि ताईंच्या पायातून निघणारा नाद एकत्रित होऊन वातावरणात सगळीकडे पसरत आहे’, असे मला जाणवले.
३. मी प्रथमच सोनियाताईंच्या नृत्याला साथ करत होतो, तरीही ‘ताईंना मी पूर्वीपासूनच तबल्याची साथ करत आहे’, असे मला वाटले.
४. एरव्ही बहुतांश कथ्थक कलाकार ‘तत्कार’ पुष्कळ जोरकस (जोर देऊन) करतात. त्या वेळी जडत्व जाणवते; पण सोनियाताई तत्कार करत असतांना मला त्यांचे नृत्य बघत रहावेसे वाटत होते. त्यात मधुरता होती.
५. ‘थाट’ (टीप ४) या नृत्यप्रकाराला तबल्याची साथ करत असतांना माझ्या मनाला शांतता आणि स्थिरता जाणवत होती.
टीप ४ – कथ्थक नृत्याच्या आरंभी ‘थाट’ केला जातो. यामध्ये कोणत्याही भावाचे प्रदर्शन केले जात नाही. केवळ अंग-प्रत्यंगाच्या साहाय्याने आकर्षकपणे शरिराची एकाच जागेवर उभी केलेली आकृती म्हणजे ‘थाट’ होय.
२ आ. श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांना शिकायला मिळालेली सूत्रे
१. त्यांनी नृत्य करतांना काही बंदिशी (नृत्यातील रचना) समेवर आल्या (टीप ५) नाहीत. तेव्हा त्यांनी ‘माझ्याकडून नीट झाले नाही’, असे प्रामाणिकपणे सांगितले.
टीप ५ – सम म्हणजे तालाची पहिली मात्रा. समेवर येणे, म्हणजे रचनेचा आरंभ तालाच्या पहिल्या मात्रेपासून होऊन त्या रचनेचा शेवट पहिल्या मात्रेवर होणे. भारतीय शास्त्रीय गायन किंवा नृत्य यांत ‘समेवर येणे’, याला अधिक महत्त्व आहे. समेवर आले, तरच ‘कलाकाराचे नृत्य अचूक आहे’, असे मानले जाते.
२. ताई नृत्य करतांना नृत्याशी पूर्ण एकरूप होऊन जातात.’
– श्री. गिरिजय प्रभुदेसाई, संगीत विशारद (तबला), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.२.२०२२)
३. सौ. सोनिया अतुल परचुरे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
अ. ‘नृत्य करतांना आवश्यक असलेली निरीक्षणक्षमता, आत्मविश्वास, तत्परता आणि समयसूचकता’, हे गुण सोनियाताईंमध्ये आहेत. त्यांचे नृत्य पहात असतांना त्यांचे हे गुण ठळकपणे लक्षात येतात.
आ. सोनियाताईंचा कार्यक्रम पहातांना त्यांची गुरूंवरील श्रद्धा दिसून आली. ‘जे काही चांगले झाले, त्याचे श्रेय गुरूंना देणे आणि ‘चूक झाली, तर ती सर्वस्वी माझी असेल’, असे म्हणणे, नृत्यातील जो भाग त्यांना जमला नाही, त्या ठिकाणी ‘हे मला व्यवस्थित जमले नाही’, हे प्रामाणिकपणे सांगणे, कोणताही नृत्यप्रकार करायला आरंभ करतांना ‘मी प्रयत्न करते’, असे म्हणणे’, ही त्यांच्यातील अहं न्यून असल्याची उदाहरणे लक्षात आली.
इ. सोनियाताई आजही वयाच्या ४८ व्या वर्षी नृत्याचा ८ – ८ घंटे सराव करतात. यातून ‘त्या त्यांच्या कलेशी पुष्कळ प्रामाणिक आहेत’, हे लक्षात आले.
ई. सोनियाताईंच्या नृत्याच्या वेळी श्री. गिरिजय प्रभुदेसाई तबला वाजवून त्यांना साथ करत होते. नृत्य करतांनासुद्धा त्या मधे मधे श्री. गिरिजय यांना दाद देत होत्या.
– सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी (४.२.२०२२)
|