प्रेमळ, तत्त्वनिष्ठ आणि संतांप्रती भाव असलेला ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा जळगाव येथील कु. सोहम् उदय बडगुजर (वय १० वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. सोहम् उदय बडगुजर हा या पिढीतील एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. सोहम् बडगुजर महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून तो ६३ टक्के पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये त्याची पातळी ६५ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी (३१.३.२०२२) या दिवशी जळगाव येथील कु. सोहम् उदय बडगुजर याचा १० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. सोहम् बडगुजर याला १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. आश्रमातील कार्यपद्धती आत्मसात् करून त्याप्रमाणे दैनंदिन नियोजन बनवणे
‘एकदा माझा मुलगा कु. सोहम् बडगुजर (वय १० वर्षे) माझ्या समवेत रहाण्यासाठी जळगावहून देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आला होता. (‘सोहमची आई देवद आश्रमात रहाते आणि सोहम् जळगाव येथे घरी रहातो.’ – संकलक) देवद आश्रमात आल्यानंतर सोहमने आश्रमातील सर्व कार्यपद्धती लवकर आत्मसात् करून घेतल्या. आश्रमातील कार्यपद्धतींनुसार त्याने त्याचे दैनंदिन नियोजन केले. त्यात त्याने ‘नामजप करणे, सेवा आणि शालेय अभ्यास करणे’, यांचे नियोजन कौशल्यपूर्ण केले.
२. आश्रमातील साधकाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला शुभेच्छापत्र बनवून देणे
आश्रमात असतांना आश्रमातील साधकांचा वाढदिवस असेल, तर तो लगेचच त्या साधकांसाठी शुभेच्छापत्र बनवत असे. त्याच्या या कृतीतून मला त्याच्यातील इतरांविषयी असलेला प्रेमभाव जाणवत असे.
३. तत्त्वनिष्ठता
या कालावधीत माझ्याकडून खोली आणि सेवेचे ठिकाण येथे होत असलेल्या चुका तो मला तत्त्वनिष्ठपणे सांगत असे. चुका सांगत असतांना मला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भावनाशीलता जाणवत नसे.
४. आश्रमातील वास्तव्यात ‘मला किंवा माझ्या सेवेत त्याच्याकडून कधी कोणती अडचण येऊ नये’, याची त्याने सर्वतोपरी काळजी घेतली.
५. संतांविषयीचा भाव
अ. आश्रमात आल्यानंतर तो सतत सद्गुरु दादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) यांच्या आजूबाजूलाच असे, तसेच तो त्याच्याकडून झालेली प्रत्येक कृती आणि चुका सद्गुरु दादांना तत्परतेने सांगत असे.
आ. जेवणाच्या पटलावर त्याच्यासमोर सद्गुरु राजेंद्रदादा किंवा पू. अश्विनीताई (सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार) बसलेल्या असतील, तर तो त्यांच्याशी न बोलता केवळ त्यांच्याकडे पहात असे. त्या वेळी ‘तो त्यांच्याशी सूक्ष्मातून संवाद साधत आहे’, असे मला जाणवायचे.
इ. जळगावला घरी जाण्यापूर्वी त्याने सद्गुरु राजेंद्रदादा आणि पू. अश्विनीताई यांना कृतज्ञतापत्रे लिहिली.
६. ‘त्याच्या मनात आश्रमाविषयी अपार कृतज्ञता आहे’, असे जाणवते. आश्रमातून घरी गेल्यावर त्याने घरीही आश्रमातील कार्यपद्धती आखून त्याप्रमाणे कृती करण्यास आरंभ केला.
‘प.पू. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला सोहमसारख्या दैवी बालकाचा सहवास दिला’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. वेदांती उदय बडगुजर (आई) (३०.६.२०२१)
कु. सोहम् बडगुजर याने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी अर्पण केलेले पत्ररूपी कृतज्ञतापुष्प !सद्गुरु दादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे), तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार ! सद्गुरु दादा, मला ‘व्यष्टी आणि समष्टी साधना कशी करायची ?’, ते शिकवा ना ! मला भावपूर्ण नामजप करायला जमत नाही. ‘त्यासाठी काय आणि कसे प्रयत्न करू ?’, ते सांगा ना ! ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी सेवा कशी करायची ?’, ते मला शिकवा. मला तुमच्या सहवासात आनंद आणि चैतन्य मिळाले. ‘तुमच्या रूपात गुरुमाऊली माझ्या समवेत आहे’, असे मला जाणवते. मला तुमची पुष्कळ आठवण येणार. तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ – प.पू. गुरुमाऊलीचा, कु. सोहम् उदय बडगुजर, जळगाव (३०.६.२०२१) |
‘आपत्काळात अन्य काही सेवा नसल्यास स्वयंपाकघरात सेवा करता यावी’, यासाठी पोळ्या बनवण्यास शिकणारा कु. सोहम् बडगुजर !‘एकदा कु. सोहमने मला दूरभाष करून सांगितले, ‘‘आई, मी पोळ्या करायला शिकत आहे.’’ मी त्याला विचारले, ‘‘ते का शिकतोस ?’’ त्यावर त्याने मला सांगितले ‘‘आपत्काळात अन्य सेवा उपलब्ध न झाल्यास मी स्वयंपाकघरात सेवा करीन. त्या वेळी मला काहीतरी यायला हवे ना; म्हणून मी आता स्वयंपाक शिकत आहे, म्हणजे मला अखंड सेवा करता येईल.’’ त्याची या वयात सेवेविषयी असलेली ओढ पाहून मला आश्चर्य वाटले.’ – सौ. वेदांती उदय बडगुजर (आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.६.२०२१) |
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
|