सर्वांवर प्रीतीचा अपार वर्षाव करणारे आणि अखिल विश्वाचे परम पिता असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

३० मार्च २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील पितृवत् प्रीती’ पाहिली. आजच्या भागात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनाची निर्मळता, साधकांना साधनेसाठी अधिकाधिक साहाय्य करणे’ आदी गुणांविषयी आपण जाणून घेणार आहोत.

या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/565888.html


परात्पर गुरु डॉ. आठवले

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील निर्मळता, पारदर्शकता आणि अपार प्रीती यांमुळे त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलता येणे

६ अ. एका साधिकेने तिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी येत असलेली अनुभूती त्यांना सांगितल्यावर तिला निर्मळतेने प्रतिसाद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! : ‘रामनाथी आश्रमातील सौ. अनुपमा जोशी (वय ६९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) भावावस्थेत असतात. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी सौ. अनुपमा जोशी यांना अनुभूती सांगायला सांगितली. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले), मी सेवा करते, तेव्हा तुम्ही बालरूपात माझ्या अवती-भवती असता. कधी माझ्याशी लपाछपी खेळता. मुले आईच्या खोड्या काढतात, तशा तुम्ही माझ्या सारख्या खोड्या काढत असता.’’ त्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले हसून म्हणाले, ‘‘मागच्या कोणत्या तरी जन्मात तुम्ही माझी आई असणार !’’

६ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकाला गुडघे दुखत असल्याने खाली न बसता आसंदीवर बसण्यास सांगणे : एकदा माझे यजमान श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७७ वर्षे) स्तोत्रपठणासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत गेले होते. त्यांना गुडघेदुखीचा तीव्र त्रास आहे. खाली आसनावर बसतांना त्यांच्या तोंडून ‘आईऽ गं !’ असा उद्गार निघाला. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही अजूनही (एवढे मोठे झाल्यावरही) आपल्या आईला हाक मारता का ? आपले बालसाधक पहा ! ते आपल्या पुढे गेले आहेत. ते श्रीकृष्णाला हाक मारतात.’’ त्यानंतर ते श्री. प्रकाश मराठे यांना म्हणाले, ‘‘गुडघे दुखतात, तर खाली बसू नका. आसंदी घेऊन बसा.’’

७. ‘संसारात राहून साधना करणे कठीण आहे’, हे जाणून साधकांच्या संसाराचा भार उचलून परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्यावर करत असलेला प्रीतीवर्षाव !

७ अ. साधकांच्या शिकणाऱ्या मुलांना रामनाथी आश्रमात रहाण्यास सुचवून त्यांचा भार हलका करणे : घरापासून साधकांच्या मुलांचे महाविद्यालय फार दूर असेल, तर तिथे येण्या-जाण्यात त्यांचा वेळ, पैसा आणि शक्ती यांचा अपव्यय होतो. ‘साधकांची मुले आश्रमात राहून त्यांना जमेल तेवढी साधना करतील आणि अभ्यासही करतील’, असा विचार करून परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना रामनाथी आश्रमात रहाण्यास सुचवले. परात्पर गुरु डॉक्टरांनी अशा प्रकारे साधकांना आश्वस्त केले.

७ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांच्या रुग्णाईत आई-वडिलांना आश्रमात रहाण्यास सुचवणे : साधकांचे आई-वडील रुग्णाईत असतांना साधकांना प्राधान्य ठरवतांना अडचण येते. ‘साधकाच्या आई-वडिलांनाच आश्रमात ठेवले, तर त्यांना  अन्य साधकांचे साहाय्य मिळू शकते. त्यांचे औषधोपचार, पथ्य-पाणी सर्व नीट होईल आणि सात्त्विक वातावरणामुळे गुणही लवकर येईल’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक साधकांच्या रुग्णाईत आई-वडिलांना आश्रमात रहाण्यासाठी सुचवले आहे.

७ इ. साधनेची तीव्र तळमळ असलेल्या साधकाला सेवेला वेळ उपलब्ध व्हावा, यासाठी त्याच्या घरी अल्पाहार आणि महाप्रसाद यांचा डबा पाठवण्यास सांगणे ! : एक साधक पुष्कळ तळमळीने साधना करतो; पण त्याची मुले लहान आहेत आणि त्याच्या पत्नीचा साधनेला फार विरोध आहे. ‘त्याने पोटासाठी नोकरी केली, तर तो साधना कधी करणार ?’, असा विचार करून परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याच्यासाठी ‘दोन्ही वेळचा अल्पाहार आणि जेवण आश्रमातून पाठवण्याविषयी सुचवले.

आताच्या कलियुगात असा कोणाचा बंधू तरी असे निरपेक्षपणे साहाय्य करील का ? परात्पर गुरु डॉक्टर साधनेची तीव्र तळमळ असलेल्या साधकांना आपल्या चरणी आश्रय देतात आणि त्या साधकाच्या कुटुंबाचा योगक्षेम वहातात. (भार उचलतात.)

८. साधकांना योग्य मार्गदर्शन करून साधनेच्या पुढच्या टप्प्याला नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

८ अ. परात्पर गुरु डॉक्टर यांच्याशी झालेल्या एका सत्संगात आम्हा उभयतांना एकमेकांचा साधनेचा मार्ग लक्षात आणून देऊन समजावून सांगणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेल्या सत्संगात ते मला म्हणाले, ‘‘यजमानांविषयी (श्री. प्रकाश मराठे यांच्याविषयी) काही सांगा.’’ त्यावर काही विचार न करताच मी त्यांना म्हणाले, ‘‘सामान्यतः ते प्रेमळ आहेत; पण त्यांच्या सेवेशी संबंधित असणाऱ्या साधकांशी त्यांचे वागणे कडक असते. त्यांच्याशी बोलतांना यजमानांचा प्रेमभाव अल्प पडतो.’’ मी असे काही बोलेन, याची यजमानांना आणि मलाही कल्पना नव्हती; मात्र माझ्याकडून तसे बोलले गेले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तुम्ही असा विचार करू नका. त्यांचा कर्ममार्ग आहे. कर्तव्यकर्म करतांना काही वेळा प्रेमापेक्षा कडकपणा आवश्यक असतो. त्यांना ते काय करतात, ते करू दे. तुमचा भक्तीमार्ग आहे.’’ तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला समजून घेतले’; म्हणून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

८ आ. साधकाच्या नातेवाइकांना साधनेविषयी मार्गदर्शन करून त्याला साधनेच्या महामार्गावर आणून सोडणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! : एकदा एका साधकाचे नातेवाईक रामनाथी आश्रमात आले होते. त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाल्यावर त्या नातेवाइकांना परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘‘तुम्ही साधना म्हणून काय करता ?’’, असे विचारले. ती व्यक्ती परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाली, ‘‘मी अध्यात्मावरील ग्रंथ वाचतो.’’ त्यांना मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘अध्यात्मात शब्दज्ञानाला २ टक्के, तर कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे. आपण मन, बुद्धी आणि अहं यांचा लय होण्यासाठी साधना करतो. ग्रंथवाचनाने बुद्धीचा लय न होता बुद्धीवर आवरण वाढते आणि अहंही वाढतो. आता पुढच्या टप्पात जायचे. साधनेच्या संदर्भातील कृती करून अनुभूती घ्यायची. नामजप करायचा, सेवा करायची आणि जमेल, तसे धन अर्पण करायचे ! आले ना लक्षात ?’’

एखादा जीव कितीही आणि कुठेही भरकटला, तरी परात्पर गुरु डॉक्टर त्याचा हात पकडून त्याला साधनेच्या महामार्गावर आणून सोडतात. केवढी ही गुरुकृपा !

८ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका साधिकेला ‘संसार देवाचा असून सर्व कुटुंबीय साधक आहेत’, असा भाव ठेवून सर्वांशी प्रेमाने वागून त्यांचे मन जिंकणे’, ही साधनाच आहे’, असे समजावणे : एक साधिका प्रसारात सेवा करायची. तिचा विवाह झाल्यावर आणि नंतर पुढे बाळ लहान असल्यामुळे तिला सेवेला जाणे जमेना. तेव्हा तिची चिडचिड होऊ लागली. परात्पर गुरु डॉक्टर तिला म्हणाले, ‘‘संसार देवाचा आहे’, असे समजून केला की, साधनाच होते. ‘आपले लहान बाळ हे कृष्णाचे एक रूप आहे’, असा भाव ठेवायचा. ‘कुटुंबीय हे साधकच आहेत’, असे समजून त्यांना प्रेमाने साहाय्य करून त्यांचे मन जिंकायचे. असे केले की, झाली साधना !’’

कितीही कठीण गोष्ट असली, तरी परात्पर गुरु डॉक्टर ती सुलभ करतात आणि आपल्या विकल्पाचा संकल्प करतात.

९. ‘प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारे कशी वापरायची ?’, हे शिकवणारे परात्पर गुरु डॉक्टर !

अ. साबणाचा छोटा तुकडा इकडे-तिकडे पडून वाया जातो. तसे होऊ नये; म्हणून तो नवीन साबणाला चिकटवून वापरावा.

आ. कपडे वाळत घालतांना नीट झटकून आणि दोन्ही टोके जुळवून घालावेत.

इ. ओढणी किंवा पदर यांना हात पुसल्यामुळे तो खराब होऊ शकतो. त्यासाठी ओढणी किंवा पदर यांना पिनने हातरुमाल लावावा आणि हात त्याला पुसावेत.

ई. आपल्याला आलेले पाकीट (एन्व्हलप) कात्रीने कापल्यास ते चांगले दिसते आणि पुन्हा ते वापरता येते.

उ. वयस्कर व्यक्तीला मऊ आणि मधुर किंवा ‘त्यांना काय आवडते ?’, ते विचारून खाऊ द्यावा.

ऊ. आपण वडी, चकली इत्यादी पदार्थांचे तुकडे खावेत; पण पाहुण्यांना अखंड वडी, चकली इत्यादी खाऊ द्यावा. त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो.

या आणि अशा अनेक लहान-मोठ्या सर्वच गोष्टी त्यांनी साधकांना शिकवल्या. यावरून ‘प्रत्येक जिवाची आणि प्रत्येक कणाकणाची ते किती प्रेमाने काळजी घेतात ?’, हे आपल्याला शिकायला मिळते.’

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/566716.html

– गुरुचरणी शरणागत,

सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक