देवीहसोळ, जिल्हा रत्नागिरी येथील सनातनचे ६५ वे संत पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा (वय १०० वर्षे) रुग्णाईत असतांना आणि त्यांच्या देहत्यागानंतर आलेल्या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे

आज फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी (३१ मार्च २०२२) या दिवशी पू. जनार्दन वागळेआजोबा यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस असल्याच्या निमित्ताने…

पू. जनार्दन वागळेआजोबा

देवीहसोळ, ता. राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील सनातनचे ६५ वे संत पू. जर्नादन कृष्णाजी वागळेआजोबा यांनी १९.३.२०२२ या दिवशी देहत्याग केला. ३१.३.२०२२ या दिवशी त्यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांची नात सौ. प्रियांका सुयश गाडगीळ यांना पू. वागळेआजोबा रुग्णाईत असतांना आणि त्यांच्या देहत्यागानंतर आलेल्या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे पाहूया.

१. रुग्णाईत असतांना 

१ अ. रुग्णाईत स्थितीत आर्तभावाने गुरुदेवांकडे क्षमायाचना करणारे पू. वागळेआजोबा ! : ‘८.३.२०२२ या दिवशी पू. वागळेआजोबा रुग्णाईत असतांना मी आणि माझे पती त्यांना भेटण्यासाठी रत्नागिरी येथे गेलो होतो. त्या वेळी ते पलंगावर पडून हात जोडून देवाला आळवत होते. (छायाचित्र क्रमांक १ पहावे.) ते हात जोडून परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना प्रार्थना करत होते, ‘हे माझी गुरुमाऊली, आता माझ्याकडून फार काही नामजप होत नाही, तरी तुम्ही मला आपल्या चरणी अर्पण करून घ्या.’ ते करत असलेली क्षमायाचना पाहून माझी भावजागृती होत होती.

१ आ. सतत देवाच्या अनुसंधानात असलेल्या पू. आजोबांमुळे रुग्णालयातील खोलीमध्ये दैवी शक्तींचे अस्तित्व जाणवणे : ‘पू. वागळेआजोबा (पू. तात्या) सतत देवाच्या अनुसंधान आहेत’, असे मला जाणवले. रुग्णालयात त्यांच्या सेवेत असणाऱ्या परिचारिकांना ते प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हणून दाखवत असत. त्यांना रुग्णालयात ज्या खोलीत ठेवले होते, त्या खोलीत चंदनाचा गंध येत होता आणि तेथील वातावरण थंड झाले होते. ‘त्या खोलीमध्ये दैवी शक्तींचे अस्तित्व आहे’, असे मला सतत जाणवत होते.

रुग्णालयात रुग्णाईत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आर्तभावाने आळवणारे आणि त्यांच्या चरणी क्षमायाचना करणारे पू. वागळेआजोबा

१ इ. पू. आजोबांनी ‘मला लवकर जायचे आहे. सगळे माझी वाट पहात आहेत’, असे म्हटल्यावर ‘महर्लाेकात सर्व देवता त्यांची वाट पहात आहेत’, असे जाणवणे : मी त्यांना विचारले, ‘‘पू. तात्या, आपण आपल्या घरी लवकर जाऊया ना ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘हो, आता मला लवकरच जायचे आहे. सगळे माझी वाट पहात आहेत.’’ त्या वेळी ‘महर्लाेकात सर्व देवता त्यांची वाट पहात आहेत’, असे मला जाणवले. ९.३.२०२२ या दिवशी त्यांना रुग्णालयातून घरी नेण्यात आले. त्या वेळी ‘काही दिवसांतच ते देहत्याग करतील’, असे मला जाणवले होते.

२. पू. आजोबांच्या (तात्यांच्या) देहत्यागानंतर

२ अ. पू. तात्यांचा आनंदी तोंडवळा डोळ्यांसमोर येणे : १९.३.२०२२ या दिवशी पू. तात्यांनी देहत्याग केला. त्यांनी देहत्याग केल्याचे कळताच मला ते रामनाथी आश्रमात आले असतांना परात्पर गुरुदेवांनी त्यांना मिठी मारली होती, तो क्षण आठवला. (छायाचित्र क्रमांक २ पहावे.) त्या वेळी पू. तात्या म्हणाले होते, ‘‘आज माझ्या जीवनाचे सार्थक झाले. आता मी आनंदाने जायला मोकळा झालो !’’ त्या वेळ चा पू. तात्यांचा आनंदी तोंडवळा त्यांच्या देहत्यागानंतर माझ्या डोळ्यांसमोर येत होता.

देवा हे प्रेम कसे । प्रीत लावूनी वेडे केले ।।
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. वागळेआजोबांना आलिंगन दिले, तो भावस्पर्शी क्षण !

२ आ. पू. आजोबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांना आसंदीवर बसवण्यात आले असतांना ‘ते ध्यानस्थ अवस्थेत समष्टीसाठी नामजप करत आहेत’, असे जाणवणे : देहत्यागाच्या दुसऱ्या दिवशी पू. तात्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांना स्नान घालून आणि नवे कपडे परिधान करून आसंदीवर बसवण्यात आले. (छायाचित्र क्रमांक ३ पहावे) ते छायाचित्र पहातांना मला त्यांच्या तोंडवळ्यावर प्रसन्न भाव दिसले. त्या वेळी ‘जणू त्यांचा श्वास चालू असून श्वासातून २५ कि.मी. अंतरापर्यंत चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले. ते ध्यानस्थ अवस्थेत समष्टीसाठी नामजप करत असल्याचे मला जाणवले.

देहत्यागानंतर आसंदीवर बसवल्यावर ध्यानस्थ अवस्थेत असल्याचे जाणवणारे पू. वागळेआजोबा

२ इ. अंत्यसंस्काराच्या वेळी ज्वाळांमध्ये नागाची आकृती दिसणे : त्यांच्या पार्थिवावर अग्नीसंस्कार केले. त्या वेळी ज्वाळांचा रंग तांबडा होता. त्याच वेळी ज्वाळांमध्ये नागाची आकृती दिसली. प.पू. भक्तराज महाराज यांच्या अंत्यविधीच्या वेळीही अशाच प्रकारे नागाची आकृती दिसली होती. त्याची आठवण होऊन माझी भावजागृती झाली.

अशी दिव्य विभूती असलेले पू. वागळेआजोबा आम्हाला लाभले. आयुष्यात अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. त्यांच्या सहवासात आमच्यावर साधनेचे संस्कार झाले. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे !’

– सौ. प्रियांका सुयश गाडगीळ (पू. वागळेआजोबांची नात), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२३.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक