रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उद्योगपतीवर विषप्रयोग !

रोमन अब्रामोविच

मॉस्को (रशिया) – ‘चेल्सी फुटबॉल क्लब’चे रशियन मालक रोमन अब्रामोविच यांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामध्ये शांतीदूत म्हणून भूमिका बजावण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार युक्रेनची राजधानी कीव येथे झालेल्या बैठकीनंतर अब्रामोविच यांच्यावर विषबाधा झाल्याची लक्षणे आढळली आहेत. त्यांचे डोळे लाल होणे आणि चेहऱ्याची, हाताची त्वचा सोलणे अशी लक्षणे जाणवत होती. सध्या त्यांची प्रकृती चांगली असून ते धोक्याबाहेर आहेत. त्यांच्यावर कुणी विषप्रयोग केला, हे मात्र वृत्तात नमूद करण्यात आलेले नाही.

मी त्यांना ठोकून काढेन !  – पुतिन यांची युक्रेनला धमकी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

रोमन अब्रामोविच यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी पाठवलेली चिठ्ठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडे सोपवली. यामध्ये झेलेंस्की यांनी हे युद्ध संपवण्यासाठी आवाहन करतांना देशातील परिस्थितीची माहिती दिली होती; मात्र ही चिठ्ठी पाहून पुतिन संतापले आणि म्हणाले, ‘‘त्यांना सांगा, मी त्यांना ठोकून काढेन.’’ युक्रेनने रोमन अब्रामोविच यांच्याकडे ‘युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यात साहाय्य करावे’, अशी विनंती केली होती. रोमन अब्रामोविच यांनी ही विनंती मान्य केली होती आणि रशियानेही त्यासाठी त्यांनी अनुमती दिली आहे.

रोमन हे दोन्ही राष्ट्राध्यक्षांपर्यंत संदेश पोचवण्यासाठी तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल, रशियाची राजधानी मॉक्सो आणि युक्रेनची राजधानी कीव अशा फेऱ्या मारत आहेत.