हिंदु सणांचा विषय आला की, सरकारच्या हाताला लकवा मारतो का ? – आशिष शेलार, नेते, भाजप
|
मुंबई, २९ मार्च (वार्ता.) – हिंदु सणांना अनुमती देण्याचा विषय आला की, सरकारच्या हाताला लकवा मारतो का ?, असा प्रश्न भाजपचे नेते आणि आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी २९ मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला आहे. हिंदु नववर्षाच्या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुका यांना अनुमती द्यावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत यापूर्वीच केली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत याविषयी सरकारकडून कोणत्याही स्पष्ट सूचना देण्यात आल्या नाहीत.
अधिवक्ता आशिष शेलार म्हणाले की, सरकारने गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुकांना अनुमती देण्याची स्पष्ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. मुंबई पोलिसांनी मुंबई येथे १० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्यासाठी आतंकवादी आणि देशविरोधी शक्ती या ‘ड्रोन’ अन् ‘रिमोट कंट्रोल’ यांचा वापर करून आक्रमण करतील, अशी माहिती पोलिसांकडे आली आहे, असे ते सांगत आहेत.
‘अशी माहिती आली असेल, तर त्याविषयी सुरक्षायंत्रणांनी अवश्य दक्षता घ्यावी. यामुळे मुंबईत जमावबंदीचे कलम लावण्यात आले आहे; मात्र याच काळात गुढीपाडवा आणि रामनवमीचे कार्यक्रम येतात. रामभक्तांचा विषय आला की, सरकारची बोटचेपी भूमिका का असते ? संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोन्ही सणांना अनुमती देण्यात यावी. या कार्यक्रमात खोडा टाकू नये. आम्ही विविध मंडळे आणि समिती यांच्यासमवेत चर्चा करत असून या उत्सवात भाजप सहभागी होईल’, असे त्यांनी घोषित केले.