श्रीलंकेला कायम सहकार्य राहील ! – भारताची ग्वाही

श्रीलंकेनेही तो चीनच्या तालावर नाचून भारताच्या राष्ट्रहिताला धोका पोचवणार नाही, अशी ग्वाही भारताला देणे आवश्यक ! – संपादक

श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर (उजवीकडे)

कोलंबो (श्रीलंका) – अभूतपूर्व आर्थिक संकटाशी सामना करत असणाऱ्या तुमच्या देशाला आमचे कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांची भेट घेऊन त्यांना दिली. श्रीलंकेच्या नेतृत्वाशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी आणि ७ देशांच्या ‘बिम्सटेक’ शिखर परिषदेला उपस्थित रहाण्यासाठी जयशंकर श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. गोटाबाया यांनी या ग्वाहीसाठी भारत सरकारचे आभार मानले.

परकीय चलनाच्या तुटवड्यामुळे श्रीलंकेला आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रांत संकटाला तोंड द्यावे लागत आहे. भारताने श्रीलंकेला कर्ज स्वरूपात एक अब्ज डॉलरचे (७ सहस्र ५९८ कोटी रुपयांचे) साहाय्य देण्याचे नुकतेच घोषित केले होते.