दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा यंदा पूर्ण क्षमतेने होणार !
कोल्हापूर, २९ मार्च (वार्ता.) – दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा यंदा पूर्ण क्षमतेने होणार आहे. यंदा कोरोना संसर्गाचे कोणतेही निर्बंध भाविकांना असणार नाहीत. १६ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असून त्या दृष्टीने प्रशासनाने सिद्धता चालू केली आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘‘यंदा बाहेरून येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलधारकांना अन्न परवाना असणे आवश्यक आहे, तसेच सर्व व्यापारी वर्गाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन ‘डोस’ घेतलेले असणे बंधनकारक आहे. डोंगरावर गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास होऊ नये; म्हणून डोंगरावरील गुलालाचे अन्वेषण करूनच विक्रीसाठी ठेवण्यास अनुमती असेल.’’