सर्वांवर प्रीतीचा अपार वर्षाव करणारे आणि अखिल विश्वाचे परम पिता असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
ईश्वराच्या ईश्वरत्वाचा आणि अन्य सर्वच दैवी गुणांचा उगम त्याच्या ‘निरपेक्ष प्रीती’ या गुणातून होतो. ईश्वराची प्रीती हेच या सृष्टीचे, म्हणजे आपल्या जन्माचे कारण आणि आनंदप्राप्तीसाठीचे कार्यही आहे. भगवंताने पृथ्वीवर दहा अवतार घेण्याचे कारणही तेच असून भक्तांवरील प्रीतीमुळेच ईश्वर धर्मसंस्थापनेचे कार्य करतो. ईश्वराची प्रीती हीच धारणाशक्ती असून तोच धर्म आहे. ईश्वराच्या ‘प्रीती’ या अनन्यसाधारण गुणामुळेच सर्व जिवांना त्याची ओढ लागते. त्याच्या प्रीतीविना सूर्य, चंद्र आणि तारांगणे एका क्षणात निष्प्रभ होतील आणि आपल्या सर्वांचे जीवन कवडीमोल होईल. अशा ईश्वराचे, त्या ब्रह्मांडनायकाचे सगुण रूप असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक प्रेम हेच आम्हा साधकांचे इहलोकीचे आणि परलोकीचे वैभव आहे.
२९ मार्च २०२२ या दिवशी आपण परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांवर पितृवत् प्रेम करून त्यांना साधना आणि सेवा यांसाठी प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक कसे केले ? याविषयीची सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/565747.html
५. संत आणि साधक यांचा विचार आणि त्यांच्यावरील प्रीती !
५ अ. पू. (कै.) श्रीमती सीताबाई मराठे (सनातनच्या २१ व्या संत) यांच्यावरील प्रीती !
५ अ १. सासूबाईंचा अस्थिभंग झाल्यामुळे त्या चालू शकत नसणे; पण त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची तीव्र इच्छा असणे, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘मी आईंना (सासूबाईंना) भेटायला येतो’, असे सांगणे : माझ्या सासूबाईंचा (पू. श्रीमती सीताबाई मराठे (सनातनच्या २१ व्या संत) यांचा) अस्थिभंग झाल्यामुळे त्या चालू शकत नव्हत्या; पण त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायची तीव्र इच्छा होती. परात्पर गुरु डॉक्टरांना तसे कळवल्यावर त्यांचा निरोप आला, ‘सासूबाई रामनाथीला येऊ शकतील का ? नाहीतर मी त्यांना भेटायला येतो.’ त्यांचा हा निरोप ऐकून सासूबाईंना भरून आले. त्या मला म्हणाल्या, ‘‘त्यांचे प्रेम पुत्राच्या प्रेमाहूनही अधिक आहे. आपण त्यांना त्रास द्यायला नको. ‘मला रामनाथीचा नवा आश्रम पहायचा आहे; म्हणून आम्हीच रामनाथीला येतो’, असे त्यांना कळव.’’
५ अ २. सासूबाईंनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या हातात खाऊ देणे आणि त्यांनीही सासूबाईंचा भाव जाणून खाऊ स्वीकारणे : सासूबाईंनी मला खोबऱ्याची बर्फी करायला सांगितली आणि रामनाथीला जातांना आम्ही ती खाऊ म्हणून समवेत घेतली. आम्ही (मी आणि यजमान श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी) त्यांना ‘खाऊ प्रसादभांडारात द्यायचा असतो’, असे सांगूनही त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले आणि स्वतःच परात्पर गुरु डॉक्टरांच्या हातात खाऊ दिला. परात्पर गुरु डॉक्टरांनीही काही न बोलता आईंचा भाव जाणून त्यांच्याकडून आनंदाने खाऊ घेतला.
५ आ. पू. (कै.) डॉ. नीलकंठ दीक्षित ((सनातनचे ८७ वे संत), बेळगाव) यांच्यावरील प्रीती !
५ आ १. पू. डॉ. नीलकंठ दीक्षित ((सनातनचे ८७ वे संत), बेळगाव) रामनाथी आश्रमातून परत जातांना ते बसलेली चाकांची आसंदी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चारचाकीपर्यंत ढकलून नेणे : एरव्ही प्राणशक्ती अल्प असल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर भिंतीला धरून हळूहळू चालतात. रामनाथी आश्रमातील साधिका सौ. अंजली कणंगलेकर यांचे आई-वडील पू. डॉ. नीलकंठ दीक्षित (सनातनचे ८७ वे संत) आणि सौ. विजया दीक्षित (आताच्या पू. श्रीमती विजया दीक्षित (सनातनच्या ११३ व्या संत, वय ८९ वर्षे) रामनाथी आश्रमात आले होते. ते बेळगावला घरी जायला निघाले. तेव्हा मुलाने वडिलांची सेवा करावी, त्याप्रमाणे पू. आजोबा चाकांच्या आसंदीत बसल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी ती आसंदी त्यांच्या चारचाकीपर्यंत ढकलत नेली. केवढे हे प्रेम !
५ इ. वृद्ध साधिका श्रीमती अंभोरेआजींवरील प्रीती !
५ इ १. वृद्ध साधिका श्रीमती अंभोरेआजींना (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८९ वर्षे) ‘हे तुमचेच घर आहे. तुम्ही इथेच रहायचे’, असे सांगून आश्वस्त करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! : परात्पर गुरु डॉक्टर मिरज आश्रमात असतांना तेथे रहाणाऱ्या श्रीमती अंभोरेआजी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८९ वर्षे) परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाल्या, ‘‘परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले), मला कुणी आश्रमातून घरी पाठवले, तर मी मुळीच जाणार नाही. मी इथेच रहाणार ! खालचे अंगण झाडीन, आश्रमाच्या ‘गॅरेज’मध्ये राहीन; पण घरी जाणार नाही.’’ तेव्हा पुत्राने आपल्या आईची समजूत घालावी, तसे परात्पर गुरु डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘आजी, तुम्हाला घरी कोण पाठवणार ? हे तुमचेच घर आहे. तुम्ही इथेच आश्रमात रहा.’’ असे अपार प्रेम केवळ देवच करू शकतो.
५ ई. कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णीकाकूंचा (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला भाव !
५ ई १. सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्या निधनापूर्वी परात्पर गुरु डॉक्टर त्यांना भेटायला गेल्यावर त्यांनी ‘माझे पिताजी आले आहेत’, असे म्हणणे : सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे निधन होण्यापूर्वी परात्पर गुरु डॉक्टर त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा ‘त्या आपल्याला ओळखतात का ?’, हे पहाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना विचारले, ‘‘मी कोण आहे ?’’ तेव्हा काकूंनी त्यांना ‘‘तुम्ही माझे पिताजी आहात’’, असे दोन वेळा उत्तर दिले.
परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही आम्हा सर्वच साधकांचे प्रेमळ पिता आहात ! केवळ आमचेच नव्हे, तर तुम्ही अखिल विश्वाचे परम पिता आहात !’
(क्रमशः)
– गुरुचरणी शरणागत,
सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२१)
|