पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह ९ मंत्री शपथबद्ध
पणजी, २८ मार्च (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह ९ मंत्र्यांनी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात २८ मार्च या दिवशी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात पद आणि गोपनीयता यांची शपथ घेतली. मंत्रीमंडळात विश्वजीत राणे यांना दुसर्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे. माविन गुदिन्हो, रवि नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि बाबुश मोन्सेरात यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी ११ वाजता आगमन झाल्यानंतर राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी मुख्यमंत्र्यासह एकूण ९ मंत्र्यांना शपथ दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, रोहन खंवटे आणि गोविंद गावडे यांनी कोकणीतून; रवि नाईक अन् सुभाष शिरोडकर यांनी हिंदीतून, तर विश्वजीत राणे, मावीन गुदिन्हो, नीलेश काब्राल आणि बाबूश मोन्सेरात यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. सोहळ्याला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गोवा प्रभारी सी.टी. रवि आदींची उपस्थिती होती. २५ मिनिटांतच हा कार्यक्रम आटोपला आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहलीला परतले. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थितांच्या शुभेच्या स्वीकारल्या. मंत्रीमंडळातील ३ पदे रिक्त ठेवण्यात आली असून ही पदे अपक्ष, मगोप आणि भाजपला पाठिंबा देणार्या आमदारांना दिली जाऊ शकतात.
मी आता ‘ॲक्सिडेंटल’ मुख्यमंत्री राहिलेलो नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
‘मी आता ‘ॲक्सिडेंटल’ मुख्यमंत्री राहिलेला नाही. विधीमंडळ गटाने मला नेता म्हणून निवडले आहे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदावर आरूढ झाल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना दिली. वर्ष २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर केंद्रीय नेत्यांनी डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक केली होती. विरोधक डॉ. प्रमोद सावंत यांना ‘ॲक्सिडेंटल’ मुख्यमंत्री असे म्हणून टीका करत होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे विधान केले. डॉ. प्रमोद सावंत हे राज्याचे १४ वे मुख्यमंत्री ठरले आहेत, तसेच गेल्या दोन दशकांमध्ये सलग दुसर्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत.