पुणे शहरामध्ये अंदाजे ३० सहस्र अनधिकृत कापडी फलक आणि फ्लेक्स !
महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; कारवाईस टाळाटाळ !
पुणे – सध्या महाराष्ट्रातील मनपा निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत; मात्र ‘फ्लेक्सबाजी’ मोठ्या प्रमाणावर चालू आहे. पुणे शहर आणि उपनगर येथील काही रस्त्यांवर ३ सहस्र ९३७ कापडी फलक (बॅनर) आणि फ्लेक्स अनधिकृत आहेत, तर संपूर्ण शहरामध्ये अंदाजे ३० सहस्र कापडी फलक, तसेच फ्लेक्स अनधिकृत असण्याची शक्यता आहे. या विरोधात सामान्य नागरिकांनी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभाग, तसेच पोलीस यांकडे तक्रार प्रविष्ट करावी, असे आवाहन केले आहे. (असे आवाहन का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून कृती का करत नाही ? – संपादक)
महापालिकेचे आकाश चिन्ह विभागाचे प्रमुख विजय लांडगे म्हणाले, ‘‘फ्लेक्स लावण्यासाठी शुल्क भरून २ ते ३ दिवसांकरताच परवानगी दिली जाते. अनधिकृत फ्लेक्स, तसेच कापडी फलक यांवर कारवाई करण्याची अनुमती प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला देण्यात आलेली आहे. महापालिका वाढदिवस किंवा इतर कारणांच्या फ्लेक्ससाठी अनुमती देत नाही. आमच्यावर राजकीय दबाव नसतो. दबाव आणणार्यांवर आतापर्यंत ६ गुन्हे नोंद केले असून ७० जणांविरोधात पोलिसांकडे रितसर तक्रार प्रविष्ट केली आहे.’’ शहरातील एकूण फ्लेक्सची संख्या पाहिल्यास महापालिकेने अनधिकृत फ्लेक्स लावणार्यांवर कारवाई करणे अपेक्षिक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.