हिंदूंनो, शिवचरित्रातून शौर्य जागरणाची प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित व्हा ! – योगेश ठाकूर, हिंदु जनजागृती समिती
शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान !
रायगड – छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गडदुर्ग म्हणजे नुसती सहलस्थाने नव्हेत, तर श्रद्धास्थाने व्हायला हवीत. गडदुर्गांवर होणारे इस्लामी अतिक्रमण रोखणे, हे आपले कर्तव्य आहे. आपण सर्वांनी महाराजांच्या चरित्रातून शौर्य जागरणाची प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होऊया, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश ठाकूर यांनी केले. ‘पाली सुधागड शिवसेना शिवजयंती उत्सव २०२२’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. योगेश ठाकूर यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
या व्याख्यानासाठी पालीचे पोलीस निरीक्षक काईंगडेसाहेब, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णुभाई पाटील, पाली येथील शिवसेनेचे गटनेते आणि नगरपंचायतीचे सचिन जवके, राजेंद्र राऊत आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. या कार्यक्रमासाठी पाली सुधागड आणि पंचक्रोशीतील अनेक व्यक्ती उभ्या राहून, रस्त्यावरून जाणारे लोक आपापली वाहने थांबून व्याख्यान ऐकत होते.
२. व्याख्यानाच्या शेवटी सर्वांनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या आणि पुढील कार्यक्रमांमध्ये पुन्हा मार्गदर्शन करण्यासाठी येण्याची मागणी केली.
३. शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि सादरीकरण करण्यात आले होते.
४. माजी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णुभाई पाटील यांच्या हस्ते श्री. योगेश ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.