कामगार संघटनांचा दोन दिवस संप आणि ‘भारत बंद’ यांचा काही राज्यात संमिश्र परिणाम !
संप आणि बंद यांद्वारे जनतेला वेठीस धरणार्या कामगार संघटना त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी संप करत आल्या आहेत; मात्र याचा परिणाम देशावर होऊन देशाची मोठी हानी होते, याचा विचार कुणीही करत नाही, ही वस्तूस्थिती आहे ! याविषयी एकही कामगार संघटना कधीही बोलत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक
नवी देहली – सरकारी धोरणांच्या विरोधात कामगार संघटनांनी २८ आणि २९ मार्च या दोन दिवशी राष्ट्रव्यापी संप आणि ‘भारत बंद’ घोषित केला होता. २८ मार्च या दिवशी देशातील काही राज्यांत याचा संमिश्र परिणाम दिसून आला. यात हरियाणा, बंगाल, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये कामगार संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. या ‘भारत बंद’ला रेल्वे, रस्ते, वाहतूक आणि विद्युत् विभाग यांच्या कर्मचार्यांनीही पाठिंबा दर्शवला होता.
कामगार संघटनांचे म्हणणे आहे की, नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाने आनंदित होऊन केंद्रातील भाजप सरकारने नोकरदारांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेण्यास चालू केले आहे. ज्यामध्ये ‘ई.पी.एफ्.’चा व्याजदर ८.५ टक्क्यांवरून ८.१ टक्के करण्यात आला असून पेट्रोल, डिझेल, एल्.पी.जी., रॉकेल आणि सी.एन्.जी. यांच्या किमती अचानक वाढवण्यात आल्या आहेत.