पुणे महापालिकेचे ‘पी.एम्.सी. केअर’ वादाच्या भोवर्यात !
महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यान्वित आहेत ना ? याकडे लक्ष द्यावे. – संपादक
पुणे – नागरिकांना सातत्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागते. पाणीपुरवठा बंद असणे, जलवाहिनी फुटणे, भटक्या जनावरांमुळे नागरिकांना होणारा त्रास अशा विविध समस्यांकरता नागरिकांना थेट प्रशासनाकडे दाद मागता यावी, यासाठी महापालिकेने ‘पी.एम्.सी. केअर’ यंत्रणा उभी केली आहे; मात्र या ठिकाणी तक्रार केल्यानंतर १-२ दिवसांमध्ये कोणतीही शहानिशा न करताच ‘तुमची तक्रार बंद करण्यात आली आहे’, असे उत्तर दिले जात असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे महापालिकेने हे चालू केलेले ‘पी.एम्.सी. केअर’ बंद करून नवीन पर्यायी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
‘पी.एम्.सी. केअर’वर काही अपवाद वगळता नोंदवलेल्या तक्रारींवर प्रत्यक्षामध्ये कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. वारंवार तक्रारी करूनही काहीही उपयोग होत नाही. स्वयंचलित पद्धतीने ठराविक उत्तरे दिली जातात, असे मत नागरिकांचे आहे.
महापालिकेचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख राहुल जगताप म्हणाले, ‘‘पी.एम्.सी. केअर’द्वारे तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारदाराला टोकन क्रमांक दिला जातो. तक्रार संबंधित विभागाकडे हस्तांतर केली जाते. स्वयंचलित किंवा ठोकळबाज पद्धतीने कोणतेही उत्तर दिले जात नाही किंवा तक्रार बंदही केली जात नाही.’’ (नागरिकांना येत असलेला अनुभव आणि महापालिकेच्या तंत्रज्ञान प्रमुखांचे मत यांमध्ये एवढी तफावत का आहे ? याचा शोध घेऊन नागरिकांना योग्य सुविधा मिळण्यासाठी संबंधितांनी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा ! – संपादक)