हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय ! – सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरसई, गोवा येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ !
शिरसई, २७ मार्च – काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहून हिंदू त्यांच्यावरील अत्याचाराविषयी आज जागृत झाले आहेत. गोवा सरकारने हा चित्रपट करमुक्त केल्याने काँग्रेसला पोटशूळ उठले आहे, तर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेने चित्रपटाचे प्रसारण रोखण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट खोटा ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे. याविषयी हिंदूंनी सत्य समोर आणले पाहिजे. हिंदूंनी स्वत: धर्माचरण करून हिंदूसंघटनाद्वारे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. हिंदु राष्ट्राची स्थापना हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्वकल्याण होणारच आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शुभा सावंत यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीने गोपाळकृष्ण नगर, शिरसई येथील श्री गोपाळकृष्ण मंदिर येथे २७ मार्च या दिवशी सायंकाळी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सौ. शुभा सावंत ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि त्यासाठी करायच्या प्रयत्नांची दिशा’, या विषयावर मार्गदर्शन करत होत्या.
सभेला श्री गणेशाचा श्लोक म्हणून प्रारंभ झाला. सौ. शुभा सावंत पुढे म्हणाल्या, ‘‘भगवद्गीता’ हा हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ असून हिंदु संस्कृतीचा गौरव वाढवणारा तो मानबिंदू आहे. बर्याचदा लहान आणि युवावस्थेतील मुले यांना भगवद्गीता वाचण्यास किंवा पाठ करण्यास सांगितले जाते; मात्र ‘त्यांना त्यांच्या सध्याच्या स्थितीला गीतेचा खरोखर किती उपयोग होईल’, याकडे लक्ष दिले जात नाही. वास्तविक मुलांना भगवद्गीता शिकवण्यापेक्षा साधना शिकवणे अधिक योग्य ठरते. हिंदूंवर आज विविध माध्यमांतून आघात होत आहे. राज्यघटनेत समानतेचे तत्त्व असले, तरी हिंदु धर्म शिकवण्यास आज प्रतिबंध आहे, तर अल्पसंख्यांकांना धार्मिक शिक्षणासाठी अनुदान दिले जाते. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि बहुसंख्यांक हिंदूंवर अन्याय केला जात आहे. जगभरात ‘जिहाद’ने उच्छाद मांडलेला असल्याने हिंदूंनी त्याचा धोका ओळखून अखंड सावध राहिले पाहिजे. हिंदूंनी क्षमतेनुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान दिले पाहिजे. आज विश्वशांतीसाठी भारताकडे, भारतीय संस्कृतीकडे, आध्यात्मिक ज्ञानाकडे अन् सनातन हिंदु धर्माकडे संपूर्ण जग आशेने बघत आहे. हिंदूंनी धर्माचरण आणि शौर्यजागरणही केले पाहिजे.’’ सभेचे सूत्रसंचालन सौ. वनिता चिमूलकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. अरुण हळदणकर यांनी केले.
सभेला उपस्थित मान्यवर
शिरसई पंचायतीचे सरपंच श्री. गोकुळदास कानोळकर, श्री महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष श्री. उमाकांत कुडणेकर, पत्रकार श्री. सगुण वेर्णेकर, पत्रकार श्री. विद्या भगत, श्री गोपाळकृष्ण मंदिर समितीचे पदाधिकारी श्री. सत्यवान म्हामल, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत थिवी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार श्री. अमन लोटलीकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आवाहन
१. २ एप्रिल या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने शिरसई येथे श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात २ एप्रिल या दिवशी पहाटे ५.३० वाजता प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. या फेरीमध्ये हिंदूंनी सहभागी व्हावे.
२. गोव्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय आदींचे संघटन करणार्या ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ यांनी यंदा ‘गुढीपाडव्या’च्या निमित्ताने ५६ ठिकाणी नववर्ष स्वागतफेरीचे आयोजन केले आहे. या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.
हिंदु जनजागृती समितीने मानले आभार
हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी करण्यासाठी बहुमूल्य सहकार्य करणारे श्री गोपाळकृष्ण मंदिर समितीचे अध्यक्ष श्री. समीर मडगावकर, सचिव श्री. अशोक नाईक आणि उपसचिव श्री. सत्यवान म्हामल यांचे हिंदु जनजागृती समितीने आभार मानले आहेत.
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट सर्व जनतेपर्यंत पोचण्यासाठी प्रोजेक्टरसहित सर्व व्यवस्था विनामूल्य करीन ! – श्री. अमन लोटलीकर
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट जनतेला दाखवायचा झाल्यास प्रोजेक्टरसहित सर्व व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करण्यास माझी सिद्धता आहे. काश्मीरमधील घटना सर्व जनतेपर्यंत पोचणे आवश्यक आहे.
‘हलाल सर्टिफिकेशन’ आदींच्या विरोधात जागृती करून हिंदु धर्मरक्षणासाठी कृतीशील होणार ! – श्री. अमन लोटलीकर
हिंदु राष्ट्र-जागृती सभेला मी काँग्रेसचा नेता या नात्याने नव्हे, तर एक हिंदुत्वनिष्ठ या नात्याने उपस्थित राहिलो आहे. ‘हलाल सर्टिफिकेशन’ आदी हिंदुविरोधी कृतींच्या विरोधात जागृती करून हिंदु धर्मरक्षणासाठी मी यापुढे कृतीशील होणार आहे, असे मत श्री. अमन लोटलीकर यांनी या वेळी व्यक्त केले.
शिरसई #गोवा मे @HinduJagrutiOrg की ओर से #हिंदुराष्ट्र_जागृती_सभा का आयोजन तथा काश्मिरी हिंदुओ के उपर हुये अत्याचार का सचित्र प्रदर्शन लगाया गया उसमे सभी धर्मप्रेमीयो का उत्फुर्त सहभाग रहा।@goanewshub @goanvartalive@InGoa24x7 #MondayMotivation #HinduRashtra pic.twitter.com/Yi1CvPOauO
— satyavijay naik (@nsatyavijay1) March 28, 2022
क्षणचित्रे
१. सभेचे खास आकर्षण म्हणजे फ्रेंच पत्रकार श्री. फ्रांसुआ गोतिये यांनी सिद्ध केलेले वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्याकांडाचे सचित्र प्रदर्शन (फॅक्ट प्रदर्शन) लावण्यात आले होते.
२. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत थिवी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार श्री. अमन लोटलीकर यांनीही हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थिती लावली आणि काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्याकांडाच्या सचित्र प्रदर्शनालाही भेट दिली. श्री. अमन लोटलीकर यांनी या वेळी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित राहिलेले सर्व जिज्ञासू आणि हिंदुत्वनिष्ठ यांना सनातननिर्मित एक सात्त्विक उत्पादन भेट स्वरूपात दिले.
३. देवस्थानचे पावित्र्य टिकवण्यासाठी जत्रोत्सवात देवस्थानच्या आवारात अन्य धर्मीय स्टॉलधारकांना अनुमती न देणे, ध्वनीक्षेपकावर चित्रपटांची गाणी न लावणे आणि जुगाराला स्थान न देणे, अशा देवस्थान समितीकडे मागण्या करणारे निवेदन स्वाक्षरीसाठी सभास्थळी ठेवण्यात आले होते. हे निवेदन शिरगाव येथे होणार्या जत्रोत्वसाच्या पार्श्वभूमीवर संबंधित मंदिर समितीला देण्यात येणार आहे.
४. सभेनंतर हिंदुत्वनिष्ठ आणि जिज्ञासू यांच्यासमवेत हिंदूसंघटनाच्या दृष्टीने गटचर्चेचे आयोजन करण्यात आले आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.