प्रत्येकाने देशाच्या संस्कृतीरक्षणाचे वचन घेतले पाहिजे ! – डॉ. माधुरी कानिटकर, (निवृत्त) लेफ्टनंट जनरल

पुणे येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित वार्षिक संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा !

(निवृत्त) लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

पुणे – भिक्षा, शिक्षा, दीक्षा हे आपल्या रक्तात असते. त्याचप्रमाणे आपल्या रक्तात रक्षा सुद्धा असते. मला वर्दी घालून देशाचे रक्षण करता आले. प्रत्येकाने देशाच्या संस्कृतीरक्षणाचे वचन घेतले पाहिजे, असे मत (निवृत्त) लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित वार्षिक संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. कानिटकर पुरस्काराला उत्तर देतांना बोलत होत्या. त्यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कुलगुरु पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, उत्तरप्रदेशातील राज्यसभेचे खासदार अशोक वाजपेयी, तेलंगाणा राज्य प्रतिनिधी वेणुगोपाल आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कानिटकर पुढे म्हणाल्या, ‘‘आरोग्याच्या व्यवस्था आपल्याकडे नाहीत, असे इतरांना वाटत होते; पण आपण एकत्र येऊन काय करू शकतो ? हे सर्वांना दाखवून दिले आहे. आमचे जगातले एकमेव जोडपे असे आहे की, दोघेजण लेफ्टनंट जनरल झालो. यासाठी स्वतःच्या लक्ष्मणरेषेतून बाहेर पडावे लागेल.’’