आध्यात्मिक त्रास होत असतांना श्रीकृष्णाचा धावा केल्यामुळे त्रास उणावून कृतज्ञतेचे महत्त्व लक्षात येणे आणि सकारात्मक रहाता येणे

कु. मधुरा देशपांडे

एकदा झोपतांना मला अकस्मात् भीती वाटू लागली. त्या वेळी ‘भीती घालवण्यासाठी काय करू ?’, असे मी श्रीकृष्णाला विचारले. तेव्हा तो म्हणाला, ‘मी तुझ्या बाजूलाच आहे’, अशी कल्पना कर.’ मी त्याने सांगितल्याप्रमाणे केल्यावर मला ‘माझा हात कुणीतरी हातात घेतला आहे, तसेच माझ्याभोवती एक कवच निर्माण झाले असून मी एका ऊबदार कोषात आहे’, असे जाणवले. थोडा वेळ मला बरे वाटले; परंतु डोळे मिटताक्षणीच मला पुष्कळ त्रासदायक तोंडवळे दिसून भीती वाटू लागली. मी पुन्हा एकदा श्रीकृष्णाचा धावा केला. तेव्हा तो म्हणाला, ‘घाबरून जाण्याऐवजी या नकारात्मक शक्तींविषयी कृतज्ञता बाळग; कारण त्यांच्यामुळेच तू एवढ्या तळमळीने माझा धावा करत आहेस.’ श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे केल्यावर मला शांत वाटले, तसेच माझ्या मनातील भीती नष्ट होऊन माझ्या डोळ्यांसमोर तोंडवळे दिसणे बंद झाले; पण नंतर माझी चिडचिड होऊ लागली. ‘हे सारे मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासामुळे होत आहे’, याची मला जाणीव झाली, त्या वेळी श्रीकृष्ण म्हणाला, ‘वाईट शक्तींचे उद्दिष्ट ‘अस्थिर मनःस्थिती निर्माण करणे’, हे होते. तू माझी आठवण काढलीस आणि कृतज्ञताभावात राहिलीस; म्हणून वाईट शक्तींचे ते उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. हेच तर मनाच्या स्थिर आणि सकारात्मक स्थितीचे महत्त्व आहे. ही सकारात्मकताच तुम्हाला संकटाचा सामना करण्याचे बळ देते.

– कु. मधुरा उदय देशपांडे, एशिया पॅसिफिक (९.२.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक