१ एप्रिलपासून भविष्य निर्वाहनिधी, पोस्ट ऑफिसच्या योजना, जी.एस्.टी. आदींच्या नियमांत होणार महत्त्वपूर्ण पालट !

औषधे होणार महाग !

नवी देहली – १ एप्रिल २०२२ पासून नवे आर्थिक वर्ष चालू होत असून भविष्य निर्वाहनिधीच्या खात्यापासून (‘प्रॉविडेंट फंड अकाऊंट’पासून) जी.एस्.टी.च्या (वस्तू आणि सेवा कराच्या) नियमांमध्ये महत्त्वपूर्ण पालट केले जाणार आहेत. ‘क्रिप्टो करेंसी’मध्ये गुंतवणूक करणार्‍यांवर कर आकारला जाणार आहे. १ एप्रिलपासून ८०० आवश्यक औषधांच्या किमती या १०.७ टक्क्यांनी वाढणार आहेत. यात साध्या तापावर घेण्यात येणार्‍या ‘पॅरासिटामॉल’ गोळ्यांचाही समावेश आहे.

होणारे आर्थिक पालट जाणून घ्या !

१. १ एप्रिलपासून भविष्य निर्वाहनिधीच्या खात्यावर कर आकारला जाईल. अडीच लाख रुपयांपर्यंत कर नसेल, तर सरकारी कर्मचार्‍यांसाठी ही मर्यादा ५ लाखांची असेल.

२. पोस्ट ऑफिसची मासिक गुंतवणूक योजना (एम्.आय.एस्.) आणि वरिष्ठ नागरिक बचत योजना (एस्.सी.एस्.एस.), तसेच ‘फिक्स्ड डेपॉजिट’मध्ये गुंतवणूक करण्याचे नियमही पालटत आहेत. गुंतवणूकदारांना या योजनांवरील व्याज हे रोखीने न मिळता ही रक्कम पोस्ट ऑफिसच्या अथवा बँकेच्या बचत खात्यात जमा होईल. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या बचत खात्याला या योजनांशी जोडावे लागेल. जर गुंतवणूकदारांना तसे करता आले नाही, तर व्याजाची रक्कम पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात जमा होईल अथवा धनादेशाद्वारे मिळू शकेल.

३. ‘केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डा’ने वस्तू अन् सेवा कराच्या अंतर्गत ई-चालान (इलेक्ट्रॉनिक चालान) जारी करण्यासाठी व्यवसायांच्या वार्षिक उलाढालाची मर्यादा ५० कोटी रुपयांवरून २० कोटी रुपये केली आहे.

४. १ एप्रिलपासून ऍक्सिस बँकेतील खातेधारकांना त्यांच्या बचत खात्यामध्ये १० सहस्र रुपयांऐवजी आता १२ सहस्र रुपये किमान रक्कम ठेवावी लागेल.